अंगणवाडी सेविका, मदतनिसांचा सध्या संप सुरू आहे. या संपाचाच एक भाग म्हणून अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचारी घोषित करा, तसेच मानधनात भरीव वाढ करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी आंदोलन केले गेले.
कृती समितीच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे पमुख्य इकार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांना निवेदन दिले. अंगणवाडी सेविका व मदतनिसांना ताबडतोब भरीव मानधनवाढ जाहीर करावी.
सेविकांचे मानधन किमान 26 हजार रुपयांपर्यंत, तर मदतनिसांचे मानधन हे 18 हजारांपर्यंत वाढविण्यात यावे. मानधन वाढले तरी महागाई त्याच्या दुपटीने वाढल्यामुळे ते कमीच पडते. त्यामुळे मानधन महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी त्यात निर्देशांकानुसार वाढ करावी.
महिला व बालविकास मंत्र्यांशी चर्चा झाल्यानुसार विनायोगदान मासिक निर्वाह भत्ता पेन्शन सेवासमाप्तीनंतर देण्याचा प्रस्ताव मंत्र्यांनी मान्य केल्याप्रमाणे हिवाळी अधिवेनात मंजूर करावा. याबाबत समितीचे सचिव रजनी पिसाळ म्हणाल्या, मानधनवाढीची प्रमुख मागणी आहे,
त्यासोबतच आमच्या महिला स्वतःचा मोबाईल वापरून काम करत आहेत. शासनाने अद्यापपर्यंत नवीन मोबाईल आम्हाला दिलेले नाहीत. महागाईच्या काळात कुटुंबाला पुरेल एवढेतरी मानधन पाहिजे.