राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन एक महिना होऊन गेला तरी महायुतीतील पालकमंत्रिपदाचा पेच सुटलेला नाही. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तोंडावर आल्याने पालकमंत्र्यांच्या फेरनियुक्त्या होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.
मात्र, पुणे, नाशिकसह काही महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे हा तिढा अधिकच वाढला आहे.
2 जून रोजी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नऊ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यात अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ अशा अनुभवी नेत्यांचा समावेश आहे.
मात्र महिना झाला तरी त्यांना पालकमंत्रिपदाचे वाटप करण्यात आलेले नाही. 15 ऑगस्टपूर्वी तरी नव्या मंत्र्यांना जिल्ह्यांच्या जबाबदार्या मिळतील, अशी चर्चा होती.
मात्र हा मुहूर्त टळला आहे. अजित पवार यांनी स्वतःसाठी पुण्याच्या पालकमंत्रिपदाची मागणी केली आहे. भुजबळ यांच्यासाठी नाशिक, आदिती तटकरे यांच्यासाठी रायगड, हसन मुश्रीफ यांच्यासाठी कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची मागणी केली आहे.
मात्र, नाशिक आणि पुण्याच्या पालकमंत्रिपदासाठी भाजपही आग्रही आहे. तर आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रिपद देण्यास शिंदे गटाच्या आमदारांचा कडाडून विरोध आहे. त्यामुळे हा तिढा कायम आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे त्यावर चर्चा करून मार्ग काढणार असल्याचे समजते.