PUNE : मराठा क्रांती मोर्चाकडून साखळी उपोषणाला सुरुवात

Photo of author

By Sandhya

मराठा क्रांती मोर्चाकडून साखळी उपोषणाला सुरुवात

मराठा क्रांती मोर्चाच्या (पिंपरी-चिंचवड शहर) वतीने जालना येथील अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून पिंपरी येथे साखळी उपोषणाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी उपोषण आंदोलन सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठबळ मिळावे म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या शहर पदाधिकार्‍यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.

तत्पूर्वी, निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्पातील छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच, पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सतीश काळे व अनेक समन्वयक गुरुवारी (दि. 7) सकाळी 11 वाजल्यापासून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उपोषणाला बसले आहेत.

शहरातील मराठा क्रांती मोर्चाचे प्रकाश जाधव, लहू लांडगे, जीवन बोराडे, नकुल भोईर, अ‍ॅड. लक्ष्मण रानवडे, अभिषेक म्हसे, सागर तापकीर, वैभव जाधव, सुनिता शिंदे, गोपाळ मोरे, रविशंकर उबाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपोषणास बसले आहेत.

दरम्यान, या आंदोलनादरम्यान आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन धंगेकर यांनी दिले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम तसेच, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रशांत शितोळे यांनी आंदोलनकर्त्यांना भेटून मागण्यांना पाठिंबा दिला. तर मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी देखील यावेळी आंदोलकांची भेट घेतली.

Leave a Comment