Pune Crime : पुणे स्टेशन परिसरातील टोळीवर मोक्का कारवाई

Photo of author

By Sandhya

पुणे स्टेशन परिसरातील टोळीवर मोक्का कारवाई

ताडीवाला रस्ता भागात दहशत माजविणार्‍या गुंड टोळीविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.

आयुक्तांनी आतापर्यंत शहरातील 44 गुंड टोळ्यांविरुद्ध कारवाई केली आहे. संघर्ष ऊर्फ भाव्या निती आडसूळ (21), साहिल राजू वाघमारे ऊर्फ खरखर सोन्या (वय 22), अतुल श्रीपाद म्हस्कर ऊर्फ सोनू परमार (वय 22, तिघे रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशन) अशी कारवाई करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.

गेल्या महिन्यात आडसूळ आणि साथीदारांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली होती. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी आडसूळ, त्याचे साथीदार वाघमारे, म्हस्कर यांना अटक करण्यात आली होती.

आडसूळ, वाघमारे, म्हस्कर यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत. त्यांनी ताडीवाला रस्ता भागात टोळी तयार करून दहशत माजविली होती.

या टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पाटील यांनी तयार केला होता. अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यामार्फत प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याला पाटील यांनी पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मंजुरी दिली. 

Leave a Comment

You cannot copy content of this page