
पीसीएमसी ते स्वारगेट मेट्रोमार्गावरील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या शेवटच्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. काही तांत्रिक परवानग्या बाकी आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांतच या मार्गावर देखील मेट्रो धावू लागेल, अशी माहिती सहकार व नागरी हवाई वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
या मार्गावर मेट्रोकडून सुरू असलेल्या कामांचा आढावा केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी घेतला. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हार्डीकर यांच्यासह अधिकारी समवेत होते.
मोहोळ म्हणाले की, काही स्थापत्यविषयक कामे पूर्ण केल्यानंतर आणि तांत्रिक परवानग्या मिळाल्यानंतर येत्या काही दिवसांतच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा भूमिगत मेट्रोमार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल. त्यासंदर्भातील आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे.
सहा किलोमीटर लांबीच्या या मार्गावरील कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट या स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. काही स्थानकांची नावे बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबतचे गॅझेटही लवकरच प्रसिद्ध होईल.
लवकरच या मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे. विस्तारीत मार्गाचेही भूमीपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटने मंजुरी दिलेल्या स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचे भूमिपूजनही याचवेळी होणार आहे.
वनाझ ते रामवाडी मार्गाचा पुणेकर चांगला वापर करीत आहेत. पीसीएमसी ते स्वारगेट हा १७.५ किलोमीटर लांबीचा मार्ग ९० टक्के कार्यान्वित झाला असून त्यातील दिवाणी न्यायालय ते स्वारगेट मार्गाचे कामही पूर्ण होत आहे.
तसेच, वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित मेट्रोमार्गासाठी आवश्यक परवानग्या मिळवून लवकरात लवकर त्यांचेही काम सुरू करण्यात येईल, असे असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले.