
पुणे : शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष
पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या 5 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेश झाल्यानंतर पाचही नगरसेवकांनी पुण्यातील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पहिल्याच पत्रकार परिषदेत खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच असल्याचं भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी ठासून सांगितलं आहे. त्यामुळं आता महायुतीच्या स्थानिक नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
पुण्यातील पाच माजी नगरसेवकांनी ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. विशाल धनवडे, प्राची आल्हाट, बाळा ओसवाल, संगीता ठोसर आणि पल्लवी जावळे या पाचही माजी नगरसेवकांनी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पुण्यात आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी खरी शिवसेना ही ठाकरेंचीच असल्याचं सांगितलं. आता नव्याने भाजपात दाखल झालेल्या या नेत्यांच्या वक्तव्यामुळे पुण्यातील महायुतीत मिठाचा खडा पडला आहे.
खरी शिवसेना ही ठाकरेंचीच
खरी शिवसेना ही ठाकरेंचीच आहे. पण जे काही राजकारण सुरु आहे ते चालूच राहील असं वक्तव्य विशाल धनवडे यांनी केलं. आमच्या पक्षप्रवेशाच्या पहिल्याच दिवशी आम्ही सांगितलेल आहे. ज्या पक्षामध्ये आम्ही 25 वर्ष होतो तो पक्ष वाढवण्यासाठी आम्ही जे प्रयत्न केले ते अतिशय प्रामाणिक होते. त्यामुळं त्या पक्षाविषयी आमच्याकडून कोणताही चुकीचा शब्द जाणार नाही असे धनवडे म्हणाले. शिंदे यांनी शिवसेना चोरली हे आत्तापर्यंत तुम्ही बोलत होतात त्यावर तुम्ही ठाम आहात का? असा प्रश्न विशाल धनवडे यांना विचारण्यात आला. यावेळी धनवडे म्हणाले की, 100 टक्के आम्ही आजही त्यावरच ठाम आहोत. मात्र, न्यायालयात जो काही निकाल लागेल त्याला आम्ही सामोरे जाऊ असेही धनवडे म्हणाले.
भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल आणि पल्लवी जावळे यांनी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर धनवडे आणि ओसवाल यांनी समाज माध्यमांतून आपली भूमिका स्पष्ट करताना पक्षांतर करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर मुंबईच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आज त्यांनी पुण्यात भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी खरी शिवसेना ही ठाकरेंचीच असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळं पुण्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे. भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे कार्यकर्ते काय बोलणार याकडं आता सर्वाचं लक्ष लागलं आहे.
अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही : उद्धव ठाकरे
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटातून मोठ्याप्रमाणावर पक्षांतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही. ज्याला जायचं आहे त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही, पक्षाचा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मातोश्रीवरील ठाकरे गटाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेकांना नाराजी व्यक्त केली होती. आपल्याला निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही, अशी खंत अनेकांना बोलून दाखवली होती. विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या प्रचंड यशानंतर ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक पक्षांतर करण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. पक्षात नाराजीचा सूर आवळणाऱ्या माजी नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांसमोर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विधानसभा निवडणुकीनंतर काही शिवसैनिक पदाधिकारी ठाकरेंचे शिवसेनेला सोडून गेले. त्यानंतर आता काहींनी नाराजीचा सूर आवळला आहे त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.