सांगली | रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत – आ. अरुण लाड

Photo of author

By Sandhya

सांगली:

वाढत्या उत्पादनाच्या हव्यासातून होत असलेल्या रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत होत आहे, असे प्रतिपादन आमदार अरुण लाड यांनी केले. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जैविक नियंत्रणाच्या उपाययोजना अमलात आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रांती साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अनुसूचित जातीतील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपांचे तसेच अनुषंगिक साहित्याचे वाटप करण्यात आले. भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनौच्या जैविक नियंत्रण केंद्र, प्रवरानगर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर बोरसे, डॉ. योगेश थोरात, कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. लाड म्हणाले:
“उत्पादनवाढीच्या हव्यासामुळे रासायनिक खते व किटकनाशकांचा बेसुमार वापर वाढत आहे. उत्पादन वाढले असले तरी नैसर्गिक कीड नियंत्रण कमी झाले असून, निसर्ग साखळी विस्कळीत झाली आहे. यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जैविक नियंत्रणाचा अवलंब करणे गरजेचे आहे.”

डॉ. थोरात यांनी ऊसपिकांवर येणाऱ्या किडी व त्यासाठी संशोधन केंद्रामार्फत विकसित केलेल्या जैविक नियंत्रणाच्या उपाययोजनांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक हर्षल पाटील यांनी केले, तर संचालक संग्राम जाधव यांनी आभार मानले.

Leave a Comment

You cannot copy content of this page