
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारचा समन्वय राहिलेला दिसत नाही. जागा वाटपातल्या चुका काय किंवा त्यामध्ये झालेली दिरंगाई पराभवाची कारणं काय असावीत किंवा प्रचार यंत्रणेतल्या त्रूटी यावर कोणत्याही प्रकारचे मंथन महाविकास आघाडी कडून करण्यात आलेलं नाही. जागा वाटपाची प्रक्रिया लांबत गेली. त्यामुळे कार्यकर्त्यांना प्रचाराला वेळ मिळाला नसल्याचा दावा शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी केला आहे. निवडणूकीनंतर मात्र नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडी राहील का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्यातील महाविकास आघाडी फुट पडलीय का, यावर सभ्रम निर्माण झाला असतानाच खासदार संजय राऊत यांनी फार्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटलेला नव्हता. त्यामुळे काम करायला वेळ मिळत नाही. प्रचाराला वेळ मिळत नाही नियोजन करता येत नाही. असं संजय राऊत म्हणाले.
विजय वडेट्टीवार यांनी ज्या वेदना व्यक्त केल्या त्या संपुर्ण महाविकास आघाडीच्या वेदना आहेत. चुका झाल्या त्या स्वीकारल्या पाहिजेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मिडियाशी बोलताना विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात विलंब लागला, त्यामागे काही कारस्थान आहे का? असा संशय त्यांनी व्यक्त केला होता. त्यावर संजय राऊत उत्तरादाखल बोलत होते.
आम्ही मागितलेल्या जागा काँग्रेस या क्षणी हरलेली आहे. उदा. चंद्रपूरची जागा. किशोर जोरगेवार. हे अपक्ष आमदार होते. ते शरद पवारांकडून लढायला तयार होते. त्यांनी पत्र दिलं होतं. ती जिंकणारी जागा होती. शरद पवार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि अनिल देशमुख वारंवार समजावत होते ही जागा जिंकणारी आहे. किशोर जोरगेवार निवडून येतील. ते आमच्याकडून लढणार आहेत. ती जागा सोडा. ती जागा सोडा. त्या जागेवर १७ दिवस घोळ घातला. ती जागा राष्ट्रवादीला मिळाली नाही. आणि किशोर जोरगेवार भाजपात गेले. विजयी झाले. अशा अनेक जागा आहेत. लोकसभेतील विजय वेगळा आहे. लोकसभा निवडणूकीनंतर सत्ताधारी सावध झाला असं संजय राऊत म्हणाले.
इंडिया आघाडी बाबत बोलताना राऊत म्हणाले, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांनी भूमिका मांडली. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक व्हायला हवी होती. ती झाली नाही. तसं महाराष्ट्रात विधानसभा निकालानंतर तीन पक्षात अजिबात समन्वय राहिला नाही. हे सत्य आहे. तो जर नाही राहिला तर भविष्यात त्याची किंमत मोजावी लागेल” असं संजय राऊत म्हणाले.