राहुल गांधी : कोरोना लसीच्या कंपनीकडून भाजपला हप्ता…

Photo of author

By Sandhya

राहुल गांधी

कोरोना काळात ५० लाख मृत्युमुखी पडत असताना कारोना लस बनविणारी कंपनी सिरम ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपला हप्ता देत होती. निवडणूक रोख्याच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय खंडणी वसूल करण्यास भाजप सक्रिय असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज ठाण्यात केला.

भारत जोडो न्याय यात्रा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात आली. जांभळी नाक्यावर झालेल्या सभेत राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत मंदिराच्या नावाखाली ९५ टक्के गरिबांना उपाशी मारत असल्याचे म्हटले. राम मंदिरामध्ये राष्ट्रपती आदिवासी असल्याने प्रवेश देण्यात आला नाही.

कुणीही शेतकरी, दलीत, गरीब, सर्वसामान्य माणसं नव्हती तर अरब पती, कलाकारांना प्रवेश देण्यात आल्याचे गांधी यांनी म्हटले. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कशी फोडली, त्यांना पैसे देऊन फोडल्याचा आरोपही गांधी यांनी करून भाजपवर हल्ला बोल केला.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस शहर अध्यक्ष ॲड विक्रांत चव्हाण, खासदार राजन विचारे यांच्यासह अनेक नेते उपस्‍थित होते.

मुंब्र्यापासून यात्रेला सुरुवात झाली. त्यांनी कळव्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि कोर्ट नाक्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले.

आनंदाश्रमासमोरून यात्रा गेली, मात्र रस्त्याच्या पलीकडे दिवंगत आनंद दिघे यांचा पुतळा असल्याने पोलिसांनी गांधी यांना गाडीतून उतरून रस्ता क्रॉस करून देण्यास आयोजकांना परवानगी दिली नाही. त्यामुळे पुष्पहार अर्पण न करता यात्रा पुढे गेली.

Leave a Comment

You cannot copy content of this page