लडाखच्या लोकांची जमीन हिसकाऊन तीही अदानींना देण्याचा भाजप सरकारचा डाव आहे, पण आम्ही ते होऊ देणार नाही अशा शब्दात कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लडाख दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात कारगिलमधील सभेला संबोधित करताना भाजपवर हल्ला चढवला.
ते म्हणाले की याच कारणास्तव ते लडाखच्या लोकांना योग्य प्रतिनिधित्व देत नाहीत कारण त्यानंतर स्थनिकांच्या जमीनी हिसकावणे त्यांना अवघड जाणार आहे. त्यांचा येथील सारा खेळ जमीनीशी संबंधीत आहे असेही ते म्हणाले.
चीन लडाखमधील भारताचा भूभाग बळकावत आहे असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी पुन्हा केला. ते म्हणाले की, “लडाख हे एक व्युहरचनेच्यादृष्टीने महत्वाचे स्थान आहे आणि येथील भारताची जमीन चीनने बळकावली आहे.
लडाखमधील एक इंचही जागा चीनने घेतलेली नाही असे पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्ष नेत्यांच्या एका बैठकीत बोलताना सांगितले असले तरी ते खोटे आहे असे ते म्हणाले.
ते म्हणाले की भारत जोडो यात्रेच्यावेळही मी लडाखला येणार होतो, पण खराब हवामानामुळे ते मला जमले नाही. यावेळी मात्र मी येथे आवर्जून दौरा केला आणि मोटारसायकल वरूनही या भागात फेरफटका मारल्याचे त्यांनी नमूद केले.
राहुल गांधी हे गेले आठवडाभर लेह आणि लडाखच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी आज कारगीलला भेट दिली. येथे त्यांनी व्यापक स्तरावर लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लष्करात काम केलेल्या निवृत्तांशीही चर्चा केली. तसेच बाजारपेठेत जाऊन सामान्य नागरीकांशी संवाद साधला.