पालकमंत्री दादा भुसेंचि राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर सेल सुरू करण्याची मागणी

Photo of author

By Sandhya

पालकमंत्री दादा भुसे

ऑनलाइन पद्धतीने फसवणुकीचे प्रमाण वाढले असून, त्यास आळा घालण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर सेल सुरू करण्याची मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे.

यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सोशल मीडियासह इतर संकेतस्थळ, ॲप्सच्या माध्यमातून भामटे नागरिकांना दररोज गंडा घालत आहेत.

फसवणूक होणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या ही मोठया प्रमाणावर आहे. सद्यस्थितीत जिल्हास्तरावर सायबर सेल कार्यान्वित आहेत.

मात्र ऑनलाइन फसवणुकीचे वाढते प्रमाण व दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या बघता सायबर सेलमधील नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे.

त्यामुळे फसवणूक केलेल्या गुन्हेगारांचा शोध व गुन्ह्यांच्या तपासावर परिणाम होत असल्याचे भुसे यांनी सांगितले. यामुळे गुन्हेगारांना त्याचा फायदा होत असून, या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर सेल सुरू करण्यात यावा, अशी मागणी भुसे यांनी पत्राद्वारे केली आहे.

तसेच मुंबई पोलिस धर्तीवर राज्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये सायबर सेल कार्यान्वित करून तेथील पोलिस ठाणे अंमलदारांमार्फत विशिष्ट आर्थिक मर्यादेपर्यंत दाखल गुन्ह्यांची नोंद ‘नॅशनल सायबर पोर्टलवर’ केल्यास गुन्ह्यांचा तपास जलदगतीने होऊन आरोपींचा शोध लागेल व तक्रारदारास लवकरात लवकर न्याय मिळेल. तसेच जिल्हा सायबर सेलवरील येणारा अतिरिक्त ताण कमी होईल, असेही या पत्रात म्हटले आहे. 

Leave a Comment