सना खान हत्या प्रकरणात आज पोलिसांनी मुख्य आरोपी अमित साहू व सहकाऱ्यांची कसून चौकशी केली. मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे आमदार संजय संजय शर्मा यांना नागपुरात चौकशीसाठी बोलावत विचारपूस केली. याचवेळी अमित शाहू त्याचे सहकारी यांनाही सीताबर्डी येथील पोलीस उपायुक्त कार्यालयात आणण्यात आले होते.
दरम्यान, सना खानची आई मेहरुनीसा खान यांनाही बोलावून पोलिसांनी आज विचारपूस केली. सना उर्फ हिनाचा मृतदेह का मिळाला नाही ?असा सवाल त्यांनी उपस्थित करीत कुठलेही पुरावे अद्याप नसताना हनी ट्रॅपच्या निमित्ताने त्यांनी उलट सुलट वृत्ताबाबत माध्यमांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सना खानची आई म्हणाली, माझी मुलगी सना खान १ ऑगस्टला बेपत्ता झाली. मी पोलीस उपायुक्त राहुल मदने यांना यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी आज मला चौकशीसाठी बोलावले. आज माझ्या मुलीचा मृत्यू होऊन २४ दिवस लोटले, आरोपी ताब्यात असताना अजूनही तिचा मृतदेह मिळालेला नाही.
आरोपी अमित साहू हा पोलिसांना हिरण नदीत मृतदेह फेकल्याचे सांगत दिशाभूल करत आहे. मला पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी न्याय मिळेल अशी ग्वाही दिली.
पोलीस माझ्या मुलीचा मृतदेह शोधून काढतील यावर मला विश्वास आहे. मात्र, अद्याप कुठलाही ठोस पुरावा नसताना सना खानचा संबंध हनी ट्रॅपशी जोडणे चुकीचे आहे. मी पण सामाजिक कार्यकर्ता असल्याने आमच्या सामाजिक अस्तित्वावर प्रश्न उपस्थित होत आहे.
हिनाकडे वेगवेगळे फोन,१२ सिम होते, १२ कोटी रुपये तिच्या खात्यात होते, असे चित्र रंगविले गेले मुळात माझ्यावर बँक, सोनेतारण , घरकर्ज असे २१ लाख रुपयांचे कर्ज असून त्याचे पुरावे आहेत. पोलीस माहिती देत नाहीत तोवर अतिरंजित बातम्या देऊ नका अन्यथा कायदेशीर मार्ग अवलंबावा लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे मध्यप्रदेशचे आमदार संजय शर्मा यांना चौकशीसाठी बोलावलं होतं त्यांनी सहकार्य केलं. पुन्हा गरज पडल्यास त्यांना पुन्हा बोलावण्यात येईल. यापेक्षा जास्त माहिती सध्या चौकशी सुरू असल्याने देता येणार नाही अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.
मध्यप्रदेशमध्ये एका संशयित महिलेचा मृतदेह मिळाला होता. त्यामध्ये सना खान यांच्या कुटूंबियांना मृतदेह नसल्याचं म्हटल्यानं सॅम्पल प्रयोगशाळेत पाठवले होते. आता प्रयोगशाळेच्या मागणीनुसार पुन्हा सॅम्पल पाठवले जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.