लिहून घ्या, ४ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या पदावर नसतील. उत्तरप्रदेशात इंडिया आघाडीचे वादळ येतेयं. उत्तरप्रदेशातील लोकसभेच्या ८० पैकी किमान ५० जागा आमची आघाडी जिंकेल, असा दावा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला.
कॉंग्रेसप्रमाणेच इंडिया आघाडीचे स्टार प्रचारक असणाऱ्या राहुल यांनी झंझावाती प्रचार हाती घेतला आहे. आतापर्यंत लोकसभा निवडणुकीतील ३ टप्प्यांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर राहुल आणखी थेट स्वरूपाची वक्तव्ये करत आहेत.
त्यांनी गुरूवारी देशातील युवकांना उद्देशून एक व्हिडीओ संदेश जारी केला. त्यामध्ये त्यांनी मोदी यांच्या हातून निवडणूक निसटू लागल्याचे आणि ते पुन्हा पंतप्रधान बनणार नसल्याचे भाकीत केले. त्यानंतर उत्तरप्रदेशातील कन्नौज आणि कानपूरमधील सभांमध्ये त्यांनी मोदींविषयी लेखी गॅरंटी देण्याची तयारी दर्शवली.
कन्नौजमधून समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव निवडणूक लढत आहेत. त्यामुळे त्या सभेचे महत्व आणखीच वाढले. राहुल यांनी आताच्या निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित असल्याचे म्हटले.
आम्ही इतर राज्यांत भाजपला रोखले आहे. त्याशिवाय, उत्तरप्रदेशात त्या पक्षाचा सर्वांत मोठा पराभव होणारआहे. राज्यातील जनतेने बदल घडवण्याचे मन बनवले आहे. तसेच संपूर्ण देशात घडेल, असे भाष्य त्यांनी केले.
अखिलेश यांनीही निवडणुकीला सामोऱ्या गेलेल्या आतापर्यंतच्या टप्प्यात भाजपच्या खात्यात कमी जागा पडत असल्याचे भाकित केले. त्या सभेला आपचे नेते संजय सिंह हेही उपस्थित होते. त्यामुळे उत्तरप्रदेशात इंडिया आघाडीतील घटक पक्ष एकवटल्याचे चित्र समोर आले. त्या राज्यात लोकसभेच्या सर्वांधिक जागा आहेत.