विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीत उतरली आहे. राज ठाकरे राज्यभर दौरा करून मनसे उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. यातच राज ठाकरे यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे.
मनसेच्या मदतीने युती सरकार येईल. उद्या महायुतीला गरज लागू शकते. माझे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा माझा प्रयत्न आहे. २३ तारखेनंतर काय होईल हा नंतरचा विषय आहे, असे सांगत एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा वारसा चालवतात, हे देवेंद्र फडणवीस यांचे मत आहे. त्यांचे मत त्यांच्यापाशी. कोणी काय मत मांडायचे हे त्यांनी ठरवायचे. मी कसे ठरवणार. एखाद्या व्यक्तीला त्यांच्यात वारसा दिसत असेल तर दिसू द्या. कोण काय बोलते याची उत्तरे मी का द्यायची. याला काही अर्थ नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
माझ्याकडून एकच गोष्ट झाली नाही अन् ती म्हणजे… राज ठाकरे यांनी उभ्या आयुष्यात काही केले नाही, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर बोलताना, त्यांना वयानुसार गोष्टी काही गोष्टी आठवत नसतील. ज्या अनेक गोष्टी केल्या आहेत, त्याची एक पुस्तिका पाठवतो. माझ्याकडून एक गोष्ट नाही झाली. मी जातपात पाहिली नाही, पाळली नाही.
जातीचे राजकारण कधीही केले नाही. शरद पवार यांचे राजकारण महाराष्ट्राला माहिती आहे. मागच्या बाजूने पिल्लू सोडायचे, छोट्या मोठ्या संघटना उभ्या करायच्या, त्यांना पैसे पुरवायचे, या गोष्टी सर्वांना माहिती आहे. काही गोष्टी मला बोलायच्या नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, २०१९ मध्ये बंद खोलीत काय झाले होते, त्याबाबत भाजप बोलण्याच्या आधी मी बोललो होतो.
बंद खोलीतील चर्चेबाबत तीन-चार वर्षापूर्वी झालेल्या सभेत मी बोललो होतो. त्या सभेत नरेंद्र मोदी यांच्या सभेचा उल्लेख करत सर्व सांगितले होते. नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे व्यासपीठावर बसले होते. त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री असतील, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते. अमित शाह हेच म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना आश्वासन दिले असेल, तर त्यांनी आक्षेप का घेतला नाही. तुमचे म्हणणे अडीच वर्षाचे ठरले होते तर मग आक्षेप का घेतला नाही. त्यामुळे त्यांच्या तर्काला काही अर्थ नाही. आपल्याशिवाय सरकार बसू शकत नाही, हे जेव्हा लक्षात आले तेव्हापासून त्यांनी बोलायला सुरुवात केली. १९९५ मध्ये मनोहर जोशी आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले. तेव्हा भाजपाने दावा केला नाही. मग तुम्ही कसा दावा करता, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. एका मुलाखतीत ते बोलत होते.