राजू शेट्टी : ठाकरे यांनी कामाला लागण्याचा आदेश दिला…

Photo of author

By Sandhya

राजू शेट्टी

महाविकास आघाडीने हातकणंगले मतदार संघाच्या लोकसभा जागेसाठी महायुतीचा पराभव करण्यासाठी मला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तशी चर्चा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झाली असून, मतदार संघात कामाला लागण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती माजी खासदार स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सायंकाळी दिली.

माजी खासदार शेट्टी शिरोळ तालुक्याच्या दौर्‍यावर आले असून, त्यांनी जनसंपर्क मोहीम वाढवली आहे. या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे विशद करून शेट्टी पुढे म्हणाले की, गतवर्षी तुटलेल्या उसाला शंभर रुपये देण्याचा निर्णय साखर कारखान्यांनी घोषित केला होता; परंतु शासनाने यामध्ये हेतू पुरस्सर अडकाठी घातली आहे.

ऊस उत्पादक शेतकरी हे लक्षात ठेवून माझ्या पाठीशी ठाम उभे आहेत. त्यामुळे मला त्यांची चिंता वाटत नाही. ‘वंचित’चे प्रमुख प्रकाश आंबेडकर व त्यांचे पुत्र यांच्याशी मी संपर्क करून मला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.

लवकरच त्यांचाही मला पाठिंबा मिळेल, ते त्यांनी सांगितले. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात या मतदारसंघात आहे, वातावरण आहे त्यांनी कोणतीच कामे केली नाहीत.

जनतेशी त्यांचा कोणताही संपर्क नाही. म्हणून विद्यमान खासदारांनी ठिकठिकाणी लावलेले फलक यापूर्वीच उतरवले आहेत. कोरोना काळात तालुक्यात आपण मोठ्या प्रमाणात काम केले आहे.

जवळ जवळ एक हजारावर रुग्णांच्यावर उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला होता. संपूर्ण मतदारसंघात पदयात्रा काढून लोकांची मते जाणून घेतली आहेत. त्यामुळे आपणाला हातकणंगले मतदारसंघातून शंभर टक्के विजयाची खात्री आहे.

महायुतीचे शासन हे शेतकर्‍यांच्या विरोधात आहे. निवडणुकीनंतर आपण शासनाच्या छाताडावर बसून ऊस उत्पादक शेतकर्‍यांची बिले वसूल करणार, असा इशाराही त्यांनी येथे बोलताना दिला.

आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीकडे पाठिंब्यासाठी जाणार नाही, असे त्यांनी ठासून सांगितले. मी एकदा घेतलेला निर्णय परत बदलत नाही. एकला चलोची भूमिका माझी आजही कायम आहे. विद्यमान शासना विरोधात ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा रोष मतदानातून प्रगट होईल, असे शेवटी त्यांनी सांगितले.

Leave a Comment