राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी

Photo of author

By Sandhya

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी

राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

तर पुणे शहर परिसरात पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. सकाळी कामासाठी बाहेर पडलेल्या नागरीकांना पावसामुळे काही प्रमाणात त्रासही सहन करावा लागला.

दरम्यान महिन्याभर दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यामुळे शेती पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. मुंबईतही कालपासून पावसाने हजेरी लावली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील काही भागांमध्ये पुढील 2-3 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय होत आहे.राज्यात आजपासून बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.राज्यात अनेक भागांमध्ये सकाळपासूनत पावसाने जोरदार हजेरीही लावली आहे. पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment