मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने राज्य सरकारची गोची झाली आहे. त्यातच आता उद्या मराठा समाजाकडून सरकारला देण्यात आलेला अल्टिमेटम संपणार आहे. त्यामुळे यासाठी सुरु असणारे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरु असतानाच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटणार असल्याचे दिसत आहे. सोलापूर येथे राधाकृष्ण विखे पाटील गेले असता धनगर आरक्षणकृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्याने धनगर समाजातील बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. .
धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. पण अद्याप त्यावर मार्ग निघालेला नाही. आता पालकमंत्री विखे पाटील सोलापूर दौर्यावर आहेत.
आज शासकीय विश्रामगृहात थांबले होते. यावेळी धनगर कार्यकर्ते शेखर बंगाळे यांच्या नेतृत्वाखाली काही समाज बांधव पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन द्यायला गेले होते.
त्यावेळी निवेदन वाचत असताना खिशातील भंडारा काढून बंगाळे यांनी पालकमंत्री विखे पाटलांच्या अंगावर उधळत आरक्षण देण्याची घोषणा दिल्या.
राधाकृष्ण पाटलांच्या अंगावर भंडारा टाकल्यानंतर त्याठिकाणी एकच गोंधळ उडाला. दरम्यान, त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह सुरक्षारक्षक यांनी बंगाळे यांना मारहाण केली. नंतर पोलिसांनी बंगाळे यांना ताब्यात घेतले.