रमेश चेन्नीथला : भाजपकडून जात, धर्माच्या नावावर दुफळी निर्माण…

Photo of author

By Sandhya

रमेश चेन्नीथला

भारतीय जनता पक्ष जात आणि धर्माच्या नावावर समाजात दुफळी निर्माण करीत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज केली.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रमेश चेन्नीथला यांच्यासह केंद्रीय नेते आशिष दुवा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेते जिल्हानिहाय बैठकीसाठी गडचिरोलीत दाखल झाले आहेत.

या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना चेन्नीथला म्हणाले की, भाजप जात आणि धर्माच्या नावावर समाजात दुफळी निर्माण करीत आहे. राम मंदिराचा इव्हेंट करुन मते जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन समाजात तणाव निर्माण करीत आहे. याउलट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा काढून भाजपच्या जातीयवादाविरोधात मोठे आंदोलन उभे केले. सध्या मणीपूरमधून राहुल गांधींनी यात्रा काढली आहे. त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचेही ते म्हणाले.

भाजपने अनेक राज्यात ईडी आणि सीबीआयचा वापर करुन नेते फोडून सरकार बनविले. परंतु, काँग्रेस याला घाबरणार नाही. जगात केवळ ६ देशांमध्ये ईव्हीएमचा वापर केला जातो. अन्य देश मतपत्रिकेचा वापर करतात.

भारतातही मतदान पत्रिकेचा वापर व्हावा, अशी मागणी चेन्नीथला यांनी केली. इंडिया आघाडीत अजून जागावाटप व्हायचे आहे. लवकरच ते होईल, असे सांगून चेन्नीथला यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक आम्ही संपूर्ण ताकदीनिशी लढू, असा निर्धार व्यक्त केला.

पत्रकार परिषदेला माजी मंत्री अनिस अहमद, माजी खासदार मारोतराव कोवासे, आ. सुभाष धोटे, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार डॉ.अविनाश वारजुकर, माजी आमदार आनंदराव गेडाम, डॉ.नामदेव उसेंडी, रवींद्र दरेकर, डॉ.नामदेव किरसान, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, अॅड.गोविंद भेंडारकर यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. 

Leave a Comment