साडे तीन किलो सोने, 64 किलो चांदी; लालबागच्या राजाच्याचरणी भक्तांनी केलं भरभरुन दान

Photo of author

By Sandhya

लालबागच्या राजाच्याचरणी भक्तांनी केलं भरभरुन दान

मुंबईतील ‘लालबागच्या राजा’च्या दर्शनासाठी देशभरातून नव्हे तर जगभरातून भाविक दर्शनासाठी येतात. यंदाच्या वर्षीदेखील लाखो भाविक येथील गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. या भाविकांनी कोट्यवधींचे दान अर्पण केले आहे.

इतकेच नाही तर एका भाविकाने ई-दुचाकी अर्पण केली आहे. या वस्तूंचा ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’तर्फे रविवारी (ता.१) जाहीर लिलाव करण्यात आला.

१९ ते २८ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाच्या दहा दिवस जगभरातून नवसाला पावणारा म्हणून ख्याती असणाऱ्या ‘लालबागच्या राजा’च्या दर्शनासाठी लोक येत असतात.

यावेळी आलेल्या भाविकांनी अंदाजे अडीच कोटींच्या सोने आणि चांदीच्या वस्तू अर्पण केल्या आहेत. यासोबतच ५ कोटी, सोळा लाख इतकी रोख रक्कम दक्षिणा म्हणून अर्पण करण्यात आली आहे.

एका भाविकाने इलेक्ट्रिक दुचाकी अर्पण केली आहे. सर्व चांदी आणि सोन्याच्या वस्तूंचा जाहीर लिलाव ‘लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळा’तर्फे रविवारी करण्यात आला.

सायंकाळी पाच वाजता सुरुवात झालेला लिलाव रात्री दहा ते अकरापर्यंत सुरू राहील, असा अंदाज आहे. या लिलावात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. एकेका वस्तूसाठी लाखोंची बोली लावण्यात येत होती. या वेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सोन्याच्या वस्तू गणपतीला साडेतीन किलोच्या सोन्याच्या वस्तू अर्पण करण्यात आल्या. यात मुकुट, झुंबर, छत्री, जास्वंदी हार, अंगठी, चैन, बांगडी, गणेशमूर्ती, इमारतीची प्रतिकृती, उंदीर याचा समावेश आहे.

चांदीच्या वस्तू ६४ किलो चांदीच्या वस्तू अर्पण केल्या आहेत. यामध्ये चांदीचा पाट, भव्य मोदक, गणेशमूर्ती, छत्री, मुकुट, केळीचे पान, चांदीच्या केळी आणि प्रसाद, नारळ, कलश, घंगाळे, समई, जास्वंदीचे फूल अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page