लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचे मतदान होत असून, मतदानाची प्रक्रिया पूर्ण होत आहे. यानंतर ०४ जून रोजी मतमोजणी आहे. लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळण्याविषयी इंडिया आघाडी आणि एनडीए दोन्ही गटाकडून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
राजकीय वर्तुळासह जगाच्या नजरा आता ०४ जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे लागले आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ०४ जून रोजी इंडिया आघाडी जिंकत आहे, असा दावा केला आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ०४ जून रोजी इंडिया आघाडी जिंकत आहे. १२ वाजल्यानंतर तुम्हाला कळेल इंडिया आघाडीचा पंतप्रधान होणार आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी हे त्यांची चॉइस असल्याचे सांगितले असून, मीही सांगतो की, संपूर्ण देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत.
आम्ही सर्व राहुल गांधी यांच्या पाठी उभे राहू. राहुल गांधींनी देशात ज्या पद्धतीने मेहनत घेतली आहे, त्याला तोड नाही. देशाने राहुल गांधींना स्वीकारले आहे. राहुल गांधींचे नेतृत्व जनतेने स्वीकारले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोग जनतेची सोय बघत नाही निवडणूक आयोगाला हाताशी पकडून सेलिब्रिटींच्या सोयींसाठी तारखा घेतल्या आहेत. पंतप्रधानांनी शेवटच्या टप्प्यात स्वत:चे मतदान ठेवले.
निवडणूक आयोग जनतेची सोय बघत नाही, तर राजकारणातील सेलिब्रिटींची सोय बघत आहे. हे सत्य आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. तसेच राज्यातील सरकार घटनाबाह्य आहे. भ्रष्टाचारातून निर्माण झालेले हे सरकार आहे. सरकारचा बेकायदेशीर मुख्यमंत्री आम्हाला नोटीस पाठवतो. महाराष्ट्रात या लोकांनी पैशाचा पाऊस पाडला.
फोटोसोबत ट्विट केले आहे. हेलिकॉप्टरमधून पैसे आणले, आमच्याविरोधात गुन्हा दाखल करा. ०४ जूननंतर खूप मजा येणार आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. दरम्यान, आम्ही घाबरणारे लोक नाहीत. या देशात खरे बोलणाऱ्यांच्या विरोधात केस दाखल होते किंवा एफआयआर दाखल केला जातो किंवा तुरुंगात टाकलं जाते.
मी जे पेपरात लिहितो, तो सत्याचा आधार असतो. आमची लढाई भाजपासोबत होती. आम्ही भाजपचा पराभव करत आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पैशाचे अमाप वाटप करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कितीही पैसा वाटला तरी त्यांना राज्यात यश मिळणार नाही. पण ०४ जूननंतर चक्र उलटे फिरणार आहे हे लक्षात घ्या. आम्हाला चिंता नाही. आम्हाला भीती नाही, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.