पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण ४८ जागा आहेत. त्यापैकी २३ जागांची उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची (UBT) मागणी काँग्रेसने फेटाळून लावली. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, “आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवण्यावर ठाम आहोत. जागावाटपाचा फार्म्युला दिल्लीत ठरेल. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जागावाटपाच्या बाबतीत दिल्लीत आज चर्चेसाठी आहेत”. “…आजही शिवसेना महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे.
लोकांचा शिवसेना आणि शरद पवारांना पूर्ण पाठिंबा आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. शिवसेना नेहमीच २३ जागा लढत आली आहे.
मागील निवडणुकीत आम्ही १९ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे १९ जागांबाबत काहीच बोलू नका. जागावाटपाबाबत काँग्रेसच्या निर्णय घेणाऱ्या नेत्यांशी आम्ही सकारात्मक चर्चा करत आहोत…” असे राऊत यांनी म्हटले आहे.
शिंदे गटाला भाजपमध्ये विलिन व्हावे लागणार. शिवसेना फुटीसंदर्भात बोलत असताना ते म्हणाले की, “पार्टी फुटण्याने फरक पडत नसतो, पक्षीय फुटीनंतरही आम्ही अंधेरीमधील पोटनिवडणूक जिंकलोच.
शिंदे भाजपमध्ये विलिन होणार याबद्दल बोलत असताना ते म्हणाले की, ” शिंदेच्या शिवसेनेला भाजपमध्येच विलिन व्हावेच लागणार. शिंदे गटाला भाजपामध्ये विलगकरणाशिवाय पर्याय नाही आणि शिंदे गटाला भाजपाच्या कमळावरचे भुंगे म्हणून फिरावे लागणार.