संजय राऊत : “अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”

Photo of author

By Sandhya

संजय राऊत

ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. हिंडेनबर्ग प्रकरणात आधीच कायदेशीर बाबींना सामोरे जात असलेल्या अदानी यांना अमेरिकेच्या न्यायालयात अब्जावधी डॉलर्सची कथित लाच आणि फसवणुकीप्रकरणी आरोप करण्यात आले आहेत. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य करताना टीका केली आहे. 

न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात गौतम अदानी यांच्यासह सात जणांवर अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप ठेवण्यात आला होता. सोलार एनर्जीचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना २५० मिलियन डॉलर्स देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे यात सांगण्यात आले होते.

या प्रकरणात गौतम अदानी आणि त्यांच्या काही नातेवाईकांसह आठ जणांची नावे आहेत. गौतम अदानी, सागर अदानी, विनीत एस जैन यांनी अमेरिकन, परदेशी गुंतवणूकदार आणि बँकांशी खोटे बोलून ही लाचेची रक्कम उभी केल्याचा आरोप आहे. यावरून संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. 

देशासाठी शरमेची गोष्ट ट्रम्प प्रशासनाने गौतम अदानी यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे. हे देश, मोदी आणि पूर्ण भाजपासाठी शरमेची गोष्ट आहे. अदानींमुळे या देशाला एक डाग लागला आहे. अशा लोकांच्या हातात देशाची अर्थव्यवस्था मोदी देत आहेत. धारावी ते एअरपोर्टपर्यंत सर्व अदानी यांना विकले.

महाराष्ट्राला अदानीराष्ट्र बनवणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ट्रम्प यांनी सुत्र हाती घेतल्यानंतर अदानी यांच्याविरोधात वॉरंट काढले. महाराष्ट्रातील अनेक टेंडर्स गौतम अदानी यांनी बळकावण्याचा प्रयत्न केला, या शब्दांत संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले.

दरम्यान, काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन गौतम अदानी यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. देशात मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठवले जात आहे पण अदानींना काहीही होत नाही. हे उद्योजक पंतप्रधान मोदींना पूर्ण पाठिंबा देत आहेत.

पंतप्रधान मोदी सतत त्यांचा बचाव करत आहेत. सरकार अदानींविरोधात कारवाई करत नाही. आता अमेरिकन एजन्सीने त्यांनी गुन्हा केल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदी हे अदानींच्या कंट्रोलमध्ये आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Leave a Comment

You cannot copy content of this page