भाजपाने लोकसभेची महाराष्ट्रातील २३ जागांची यादी जाहीर केली आहे. तर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सुनील तटकरेंची उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीच्या जागावाटपचा तिढा मात्र सुटलेला नाही.
२८ मार्चला आम्ही तुम्हाला हे चित्र स्पष्ट करु असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात असं म्हणत महायुतीवर जोरदार टीका केली आहे.
काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी? “गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात. जे मांडलिक असतात, गुलाम असतात, आश्रित असतात त्यांना मागण्याचा अधिकार आणि हक्क नसतो. त्यांच्या तोंडावर कायम तुकडे फेकले जातात.
आमचं जागावाटप आम्ही महाराष्ट्रात करतो. कधी मातोश्री, सिल्वर ओक किंवा अन्य ठिकाणी बसतो. आम्हाला उठसूट दिल्लीत जाऊन नेत्यांच्या लॉनवर रुमाल टाकून बसावं लागत नाही.” अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
बारामतीबाबत काय म्हणाले संजय राऊत? “भाजपा लोकांना गळाला लावतात, त्यानंतर ती माणसं गाळात जातात. बारामतीत सुप्रिया सुळे जिंकून येतील याविषयी आमच्या मनात शंका नाही. आम्ही सगळे पक्ष तिथे कामाला लागलो आहोत.
मी बारामतीत सभा घेतल्या आहेत. वेळ पडल्यास उद्धव ठाकरेही तिकडे सभा घेतील. मी इतकंच सांगतो बारामतीत कुणीही येऊ द्या सुप्रिया सुळे प्रचंड मताधिक्याने जिंकून येतील. त्यामुळे माणसं गळाला लावून गाळात घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत.”
आमचे उमेदवार आमच्या मतदारसंघांत कामाला लागले आहेत. यादीही हातात येईलच असंही संजय राऊत म्हणाले. त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची निरंतर चर्चा सुरु आहेत.
प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसह रहावेत अशीच आमचीही इच्छा आहे आणि त्यांचीही इच्छा आहे असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.