संजय राऊत : “…तर अटल बिहारी वाजपेयींनीही आणीबाणी लागू केली असती”….

Photo of author

By Sandhya

संजय राऊत

केंद्र सरकारने दरवर्षी २५ जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावरून पुन्हा एकदा देशातील राजकीय वातावरण तापलं आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयावर आता विविध राजकीय प्रतिक्रियादेखील उमटू लागल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या निर्णायावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना सरकारचं डोकं ठिकाणावरून नसून त्यांच्याकडे कोणतेही काम बाकी नाही, त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत? – “आणीबाणीला आता ५० वर्ष झाली आहेत. त्यावेळी काही लोक अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत होते. आर्मीने आणि पोलिसांनी सरकारचे आदेश मानू नये, असं आवाहन रामलीला मैदानावरून करण्यात आलं होतं.

त्यामुळेच आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असते, तर त्यांनीही आणीबाणी लागू केली असती. हा देशाच्या सुरक्षेचा विषय होता”, असं संजय राऊत म्हणाले.

“ज्यावेळी आणीबाणी लागू झाली, त्यावेळी काही लोक देशात बॉम्ब बनवत होते. काही ठिकाणी बॉम्बस्फोट देखील झाले, हे सर्वांना माहिती आहे. अमित शाह यांना आणीबाणी काय हे माहित नाही.

तेव्हा ते किती वर्षांचे होते हे मला माहिती नाही. पण आज ते ज्या बाळासाहेब ठाकरेंचे गुणगाण गातात, त्याच बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. त्यांनी इंदिरा गांधी यांच्या निर्णयाचं समर्थन केलं होते. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आणीबाणीचं समर्थन केलं होतं”, अशी प्रतिक्रियाही संजय राऊत यांनी दिली.

“आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर जनता पक्षांची सत्ता आली. त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी सत्तेत आले. यादरम्यान, चंद्रशेखरदेखील पंतप्रधान झाले. मात्र, यापैकी कुणालाही संविधानाची हत्या झाली असं वाटलं नाही. मग हे दोन टिपुजी राव कोण आहेत?” अशी खोचक टीकाही त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर केली.

“मोदी सरकारकडे सध्या कोणतेही काम नाही. हे सरकार लोकांना भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे. या सरकारकडे बहुमत नाही. लोकांनी यांना नाकारलं आहे. त्यामुळे या सरकारचं डोकं ठिकाणावर नाही.

मोदी सरकारच्या १० वर्षांचा कार्यकाळ बघितला, तर त्यांनी प्रत्येक दिवशी संविधानाची हत्या केली आहे. मुळात या लोकांना संविधान बदलायचं होतं, त्यामुळे जनतेने यांना बहुमत दिलं नाही”, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

Leave a Comment

You cannot copy content of this page