मुंबईतील वरळी भागात रविवारी पहाटे भरधाव वेगात कार चालवत मिहीर शाह या तरुणाने दोघांना धडक दिली. यामध्ये कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी मिहीर शाह हा अपघात झाल्यापासून फरार झाला होता.
शिंदे गटाचे राजेश शाह यांचा मिहीर शाह हा मुलगा आहे. मिहीर शाह याला पोलिसांनी मंगळवारी अटक केलं. या अपघाताच्या संदर्भात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला. “वरळीतील आरोपीच्या वडीलांचं गुन्हेगारी रेकॉर्ड चेक करा. त्यांचा अंडरवर्ल्ड संबंध आहे”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत काय म्हणाले?
“वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला वाचवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. वरळी हिट अँड रन हे प्रकरण साधारण नाही. पुण्यात जसं पोर्श कार अपघाताचं प्रकरण घडलं होतं तसंच हे वरळीतील प्रकरण आहे.
त्या वरळीतील आरोपीच्या वडीलांचं गुन्हेगारी रेकॉर्ड चेक करा.ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे व्यक्ती कसे बनले? त्यांचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे. त्या आरोपीच्या वडिलांचे गुन्हेगारी रेकॉर्ड सर्वांच्यासमोर आणा. याबाबत मी मुंबई पोलीस आयुक्तांना आवाहन करतो.
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कोणते लोक आहेत हे आता तुम्हाला यावरून समजलं असेल. या प्रकरणातील आरोपी नशेत होता. पण ही नशा मेडिकल टेस्टमध्ये येऊ नये, म्हणून तीन दिवस आरोपीला लपून ठेवलं”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.