राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व मुलींना मोफत उच्च शिक्षण या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या योजनांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आरलेली नाही.
अर्थसंकल्पानंतर सरकार अशा घोषणा करत असल्याने भविष्यात या योजनांची शाश्वती देता येत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खा. शरद पवार यांनी केली. दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार माझ्या संपर्कात नसून, आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असले तर काही माहीत नाही, अशीही गुगली त्यांनी यावेळी टाकली.
खा. शरद पवार हे सातारा जिल्हा दौर्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खा. पवार म्हणाले, राज्य शासनामार्फत करण्यात येणारी विकासकामे व योजनांची अंमलबजावणी अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार केली जाते. सद्यः स्थितीत शासनावर कर्जाचा डोंगर उभा आहे. आर्थिक अडचणी सरकारपुढे आहेत.
अनेक योजना व विकासकामांसाठी निधी मिळत नाही. एवढेच नव्हे, तर शासकीय वसतिगृहांची अनुदाने दोन दोन वर्षे रखडली आहेत. एकीकडे सरकार अडचणीत असताना अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नसताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व मुलींना मोफत उच्च शिक्षणाची घोषणा केली जात आहे. अर्थसंकल्पात योजनांसाठी आर्थिक तरतूद नसल्याने या योजनांची शाश्वती नाही.
अंदाजपत्रक जाहीर झाल्यानंतर आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या दोन्ही योजना चांगल्या असून सरकार निधी देणार असेल तर महिलांना लाभ मिळावा म्हणून त्यांचे अर्ज भरण्यासाठी पुढाकार घेवू, असेही खा. पवार म्हणाले.
देश चुकीच्या दिशेने घेवून जाण्याचा नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न जनतेने हाणून पडला. विधानसभा निवडणुकीतही असाच निर्णय जनता घेईल. मराठा आरक्षणाचा विषय सरकारने चर्चेतून मार्गी लावला पाहिजे.
अजित पवार गटाचे आमदार तुमच्या संपर्कात आहेत का? असे विचारले असता खा. पवार म्हणाले, सध्या माझ्या संपर्कात कोणीही आमदार नाहीत, मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात कोणी आमदार असतील तर सध्या मला काहीही सांगता येणार नाही. आम्हाला लोकसभेला तुतारी आणि पिपाणी यामुळे फटका बसला.
सातार्यातही तेच झाले. आमचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आहे. आम्ही स्थापन केलेला पक्ष आणि चिन्ह वेगळी भूमिका घेतलेल्या लोकांना दिले आहे. हे सगळं प्रकरण कोर्टात आहे, पुढील आठवड्यात त्याची सुनावणी आहे. स्वखुशीने देणगी स्वीकारण्याचा दिलेला निर्णय आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, असेही खा. शरद पवार म्हणाले.