संतोष बांगर : पुढील ८ दिवसांत अंबादास दानवे स्फोट घडवणार…

Photo of author

By Sandhya

संतोष बांगर

अंबादास दानवे हे येत्या ८ ते १० दिवसांत आमच्यासोबत असतील, असा मोठा दावा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

अंबादास दानवे यांच्याबाबत त्यांनी केलेल्या दाव्याने मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ते म्हणाले, अंबादास दानवे माझे मित्र आहेत. त्यांच्यावर बोलण्यासारखे फार नाही. येत्या आठ ते दहा दिवसांत ते आमच्यासोबत असतील. आमच्या खांद्याला खांदा लावून ते काम करताना दिसतील. आता आठच दिवसांत ते स्फोट घडवून आणतील.

तसेच शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली, तरी चांगलीच बाब आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीचे नाव आमच्याकडूनच येऊ शकते, असे बांगर म्हणाले. पुढे संतोष बांगर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातात सोपवली होती.

मात्र, तीच शिवसेना संपवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले. काल मी मुंबईत असताना एक म्हातारी मला भेटली आणि मी शिंदेंच्या शिवसेनेत असल्याचे माहीत झाल्याने तिने माझी पाठ थोपटली. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला. यामुळे अक्षरशः वेदना होतात, अशा भावना बांगर यांनी व्यक्त केल्या.

२०१९ मध्ये मला उमेदवारी मिळाली. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या सभेला किती जनसमुदाय होता. पण, कालच्या सभेला काय परिस्थिती होती की सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यासाठी सक्षम नेतृत्व लागते आणि माणूस देखील तसा लागतो. मात्र, उद्धव ठाकरेंनी जे काही चेलेचपाटे जमा केले. ते सर्व खंडण्या बहाद्दूर आहेत, अशी टीका बांगर यांनी केली.

यावेळी बांगर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर सुद्धा टीका केली. माकडापाशी काकडा दिला, त्याचे मांडले दुकान, असे म्हणत बांगर यांनी टीका केली. तसेच संजय राऊत यांनी पक्षाची राखरांगोळी करून टाकली आहे.

आपण या मूर्ख लोकांसोबत असल्याचे उद्धव ठाकरे यांना हे समजत कसे नाही. याच मूर्ख लोकांच्या नादी लागून ठाकरेंनी पक्षाचा सत्यानाश करून टाकला. उद्धव ठाकरेंनी सरळसरळ भाजपच्या सोबत यायला पाहिजे, असेही बांगर म्हणाले.

Leave a Comment