मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात फरार असलेले आरोपी वाल्मिक कराड यांनी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली आहे. यामुळे सीआयडी मुख्यालयाच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेमुळे धनंजय मुंडे समर्थकही मुख्यालय परिसरात जमू लागल्याचे दिसून आले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी सीआयडीने व्यापक तपास मोहीम सुरू केली होती. तसेच या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. वाल्मिक कराड यांना या हत्येचा मुख्य सूत्रधार मानले जात असून, यावरून राजकीय वातावरणही तापले आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून, विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.
सीआयडीच्या पथकांनी मागील पंधरा दिवसांपासून कराड यांचा शोध घेतला होता. त्याचे शेवटचे लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैन येथे आढळले होते, मात्र त्यानंतर त्याचा फोन बंद असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, कराड आपल्या काही निकटवर्तीयांशी संपर्कात असल्याचा दावा आमदार धस यांनी केला होता.
सीआयडीला शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला. यात त्यांनी केज पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या तक्रारीला खोटी ठरवले. “मी पुण्यात सीआयडी कार्यालयात शरण जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमागे जे खरे गुन्हेगार आहेत, त्यांना अटक करून कठोर शिक्षा द्यावी. माझे या प्रकरणाशी कोणतेही संबंध नाहीत. मात्र, तपासात मी दोषी ठरलो, तर न्यायालयाकडून मिळालेली शिक्षा मी स्वीकारेन,” असे कराड यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.
या घटनाक्रमामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली असून, तपासाचा पुढील टप्पा कसा असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे