सरपंचाने पेटवून दिली स्वतःची नवी कार, मराठा आरक्षण लाठीचार्जचा केला निषेध

Photo of author

By Sandhya

सरपंचाने पेटवून दिली स्वतःची नवी कार

जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद आता संपूर्ण राज्यभरात उमटताना दिसत आहेत. राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी वेगळी कृती करत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी स्वतःची नवी वर्षभरापूर्वी घेतलेली चारचाकी वाहन जाळून टाकत घटनेचा निषेध व्यक्त केला.

फुलंब्री येथील पाल फाटा येथे त्यांनी हे वाहन जाळले आहे. अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे उपोषण सुरु होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या घटनेचा निषेध दर्शवत सरपंच साबळे यांनी,’आमच्या लोकांवर हल्ला होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आता आम्ही स्वत:ची गाडी जाळली, पुढे आम्ही स्वत:ला जाळून घेऊन निषेध व्यक्त करु.

सरकारने दोन दिवसांत ज्यांनी हा लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही स्वतला जाळून घेऊ,’ अशी उदिग्न प्रतिक्रिया मंगेश साबळे यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी संघटनेचे साईनाथ बेडकेदेखील उपस्थित होते.

पुढे बोलताना,’या समाजात आपल्या लोकांवर काठी पडत असेल, त्यांच्या आई-बहिणींच्या डोक्यातून रक्त निघत असेल तर सहन केलं जाणार नाही,’ असे साबळे म्हणाले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या लोकांवर पोलिसांकडून दगडफेकीनंतर लाठीचार्ज झाला. त्यानंतर राज्यातील वातावरण तणावाचे बनले आहे.

शुक्रवारी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे उपोषण सुरु होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर लाठीचार्ज केला असल्याचे पोलिसांचे  म्हणणे आहे. यात पोलिस कर्मचारी आणि आंदोलक जखमी झाले आहेत.

Leave a Comment