शरद पवार : कांद्यावरील एक्साईज ड्यूटी रद्द करा अन्यथा…

Photo of author

By Sandhya

शरद पवार

कांदा हे जिरायत भागातील शेतक-याचे पिक आहे. कांद्यावरील एक्साईज ड्यूटी अन्यायकारक आहे. पियुष गोयल यांच्या सोबतच्या बैठकीत दिल्लीत काहीतरी चांगले घडेल अशी अपेक्षा आहे.

असे घडले नाही तर शेतक-यांमधील अस्वस्थता थांबवता येणार नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

बारामतीत ते माध्यमांशी बोलत होते. कांदा प्रामुख्याने बांगलादेशला जातो, हा कांदा नाशिक, धुळे, पुणे, नगर व सातारा जिल्ह्यातील काही भागातून कांदा देश विदेशात जातो,

हे जिरायत शेतक-याचे पिक असल्याने निर्यातीवर चाळीस टक्क्यांची करआकारणी चुकीची आहे, ती तातडीने काढावी अशी आमची मागणी आहे. दिल्लीतील बैठकीत या बाबत काय निर्णय होतो ते पाहावे लागेल.

आरक्षणाच्या बाबत बोलताना पवार म्हणाले कि, आरक्षणाबाबत उपोषण, आंदोलन झाले, राज्य सरकारने काही मुदत दिलेली आहे, असे माझ्या वाचनात आले आहे.

मात्र आरक्षण देताना ज्यांना आरक्षणाचा वाटा मिळतो. तेव्हा इतर घटकांवर म्हणजेच ओबीसींवर अन्याय होऊ नये. ही भूमिका आहे, शिंदे सरकारने तशी ग्वाही दिलेली आहे. आता नक्की निर्णय काय होतो हे आज तरी सांगता येत नाही. यातून मार्ग निघाला तर आनंदाची गोष्ट आहे. नाहीतर काय होईल हे आज सांगता येत नाही.

महाराष्ट्रातील कोणतेही पत्रकार चहा किंवा ढाब्यावर जाण्यासाठी भुकेलेले नाहीत.अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे पत्रकारांचीच बेईज्जत असल्याची प्रतिक्रीया शरद पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव न घेता या बाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना व्यक्त केली.

यंदा उसाचे उत्पादन कमी आहे. त्याचा परिणाम पुढील वर्षी जाणवेल. कारखाने किती दिवस चालवायचे अशी स्थिती निर्माण होईल. यात आज लगेच काही मार्ग सांगता येणार नाही पण या साठी एकत्र बसून काहीतरी मार्ग काढावा लागेल.

केंद्र सरकार चर्चा करणार असेल तर राजकीय विचार बाजूला ठेवून सर्व सहकार्य करण्यास आमची तयारी आहे. आमच्या काळात आम्ही रॉ शुगर परदेशातून आणून त्यावर प्रक्रीया करुन ती पुन्हा परदेशात पाठविण्यासही परवानगी दिलेली होती, याचीही आठवण शरद पवार यांनी करुन दिली.

Leave a Comment