दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल (गुरूवारी) ईडीने चौकशी करून अटक केली. त्यांच्या अटकेनंतर विरोधी पक्षांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी अटक चुकीची आहे म्हणत शरद पवार यांनी केजरीवालांना आपला पाठिंबा दिला आहे.
निवडणुकीच्या काळामध्ये भाजपकडून भीती पसरवण्याचे काम सुरू आहे. आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली त्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांना अटक केली, उद्या कोणाला अटक करतील माहिती नाही असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
भाजप सत्तेचा गैरवापर केला जात आहे. राज्याच्या काही प्रमुख नेत्यावर ईडीचा वापर करून त्यांच्यावर कारवाई केली जाते. ज्या राज्यात ज्या नेत्यांचा प्रभाव आहे त्यांना तुरूगांत टाकण्याचं काम केलं जात आहे.
अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक चुकीची आहे. याआधी राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांना अटक केली त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली, राज्यात धोरण ठरवणाऱ्या राज्याच्या राज्याच्या प्रमुखाला अटक करणं ही चुकीची गोष्ट आहे, ही चितेंची बाब आहे, असंही पुढे शरद पवार म्हणाले आहेत.
अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई केली मात्र, त्याचा फायदा केजरीवालांच्या पक्षाला होईल, त्याच्या सर्व जागा निवडून येतील, दिल्लीची जनता केजरीवालांच्या बाजूने उभी राहिल असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर ईडी, सीबीआयचा वापर करणे निवडणुकीच्या काळात दहशतीचं वातावरण निर्माण करणं या सर्व गोष्टींचा मी निषेध करतो, आणीबाणीच्या काळात जे झालं नाही ते आता होत आहे, केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागणार आहे, असंही ते पुढे म्हणालेत.
केजरीवाल हे दिल्लीत बसून मोदींच्या भूमिकेला विरोध करतात. त्यामुळेच त्यांच्याविरोधात ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल, असंही शरद पवार यांनी म्हटलं.