सत्ता येते…जाते तर काही लोक सत्तेकडे आकर्षति होऊन पक्ष सोडून जातात,अशावेळी आपले विचार पक्के आणि जनतेच्या हिताचे असतील जनता सदैव आपल्या पाठीशी उभी राहते,
म्हणून जे पक्ष सोडून गेले त्याची चिंता न करता जे पक्षात आहेत तसेच पक्षाची विचारधारा पाहून पक्षात येत आहेत अशा सर्वांना बरोबर घेऊन जनतेच्या न्यायालयात जाऊन नव्या उमेदीने निवडणुकींना सामोरे जाण्याची वेळ आली आहे,असे सांगत बारामतीतील पदाधिकार्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवा कानमंत्र देऊन निवडणुकीच्या कामाला लागा, अशा संदेश दिला.
पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना पवारांनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. पवार म्हणाले, लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या कठीण काळात आपली परीक्षा आहे.
अशावेळी काही लोकांनी वेगळी भूमिका घेत पक्षातून बाजूला झाले. यामध्ये जवळचे तसेच निष्ठावान म्हणून घेणारे आहेत. अनेकांना लहान – मोठा,जातीचा – धर्माचा विचार न करता त्यांचे कार्य पाहून राज्याच्या राजकारणात मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली, असे असताना काही जण पदासाठी, स्वता:च्या स्वार्थासाठी, काही जण भीतीपोटी, काही जण दबावाखाली, पक्ष सोडून गेले.
मात्र, अनेक जण भेटून सांगतात, आम्ही तुमच्याच बाजूने असून, मतदानातून दाखवून देऊ, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन कोणी केला? पक्षाची पाळेमुळे देशात जनतेपर्यंत कोणी पोहोचविली? पक्षाला सत्तेत कोणी आणले? हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे.
संभ्रम होतोय दूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पडलेले दोन गट आणि पवार कुटुंबात पडलेली उभी फूट पाहता शरद पवार यांनी उचललेले पाऊल लक्षात घेता बारामती तालुक्यातील जनतेच्या मनातील अद्याप असलेली संभ्रमावस्था काही अंशी दूर झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.