पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांना भटकती आत्मा असं संबोधित केलं होत. या टीकेला सोमवारी शरद पवार यांनी प्रत्तुत्तर दिले. हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही, असं प्रत्तुतर त्यांनी यावेळी दिलं.
नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते. शरद पवार म्हणाले की, राजकीय टीका करताना मर्यादा ठेवायला हव्यात; मात्र निवडणुकीत मला ‘भटकती आत्मा’ म्हणाले.
पण त्यांना माहीत नसेल की आत्मा हा कायम असतो आणि हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही. श्रीराम मंदिर झाले, चांगले झाले. मीही कधी अयोध्येला गेल्यावर मंदिरात जाईन. पण राजकारणात याचा फायदा कधीही घेणार नाही.
मोदींनी तो घेण्याचा प्रयत्न केला; पण अयोध्येतील जनतेनेही हे मान्य केले नाही, असेही पवार म्हणाले. या वेळी नकली सेनेवरून मोदींनी ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना, लोकसभेत ज्याप्रमाणे महाराष्ट्राने विश्वास दाखवला, त्याप्रमाणेच विधानसभेलाही जनता आपल्यासोबत राहील, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.
व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री विजयसिंह मोहिते, अनिल देशमुख, आमदार राजेश टोपे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार उत्तमराव जानकर, पंडितराव कांबळे, बाळासाहेब पाटील, फौजिया खान, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह पक्षाचे आठ नवनिर्वाचित खासदार उपस्थित होते.
राज्यात सत्ता आणण्याचा निर्धार पुणे : मागील पाच वर्षे सरकार चालविले, ते ‘त्या’ लोकांनी आपल्या मनाप्रमाणे चालविले. त्यांनी देशाचा कुठलाही विचार केला नाही. सत्तेचे केंद्रीकरण करण्याचे सूत्र आणि आम्ही सांगेल तीच नीती, आम्ही सांगू ते धोरण, हेच सूत्र ठेवून काम केले. सुदैवाने देशातील जनतेने देशामध्ये ही नीती पुन्हा निर्माण होणार नाही, याची नोंद घेतली.
त्याप्रकारे मतदान करून प्रचंड अधिकार या एक-दोन लोकांच्या हातामध्ये होते, त्यांना मर्यादा आणल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
संसदेत अष्टप्रधान आवाज उठवतील लोकसभा निवडणुकीत आपण सामान्य उमेदवार दिले. प्रचारात जनतेचे प्रश्न घेऊन गेलो, त्यामुळे आपल्यावर विश्वास दाखवत 10 पैकी 8 उमेदवार निवडून दिले. संसदेत हे ‘अष्टप्रधान’ शेतकर्यांच्या, शेतमजुरांच्या आणि सर्व घटकांच्या प्रश्नांवर आवाज उठवतील, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.