अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. केळी, द्राक्ष, आंबा, संत्रा या फळबागांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला होता. तर हरभरा, गहू, ज्वारी भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे बळीराजा पुरता कोलमडला आहे.
त्याला दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
ही भेट सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. या भेटी अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर साधारण 50 मिनिटे चर्चा झाली. या बैठकीनंतर अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार विशेष पॅकेजची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकर भरपाई मिळावी याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
तसेच एका आठवड्यात सर्व पंचनामे केले जातील आणि लवकरच मोबदला दिला जाईल असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे एका विशेष मदतीच्या पॅकेजची घोषणा सरकार करणार असल्याचे बैठकीत ठरल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे राज्यातील सुमारे 1 लाख एकराहून अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत.