महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात या उन्हाळ्यात पाऱ्याने 40 अंश सेल्सिअसची पातळी ओलांडली आहे. यामुळे ते राज्यातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले आहे, अशी माहिती हवामान खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.
नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने (आरएमसी) दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात असलेल्या जिल्ह्यात मंगळवारी कमाल तापमान 41.8 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24.6 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
विदर्भात सकाळपासूनच कडाक्याच्या उन्हाचा तडाखा बसत असल्याने दुपारपर्यंत रस्ते निर्मनुष्य दिसत होते. रखरखत्या उन्हामुळे नागरिकांनी बाहेर पडण्याचे टाळले. दरम्यान, विदर्भातील वर्धा जिल्ह्यात 40.9 अंश सेल्सिअस, अकोला-39.9 अंश सेल्सिअस, अमरावती-39.6 अंश सेल्सिअस, यवतमाळ-39.5 अंश सेल्सिअस, बुलडाणा-39.2 अंश सेल्सिअस, नागपूर आणि गोंदिया-39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.