शिंदे गटाची पहिली यादी जाहीर ; ठाणे, नाशिक, यवतमाळचा तिढा कायम

Photo of author

By Sandhya

शिंदे गटाची पहिली यादी जाहीर

उमेदवारीवरून पक्षात प्रचंड गोंधळ आणि रुसवेफुगवे सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आठ उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. मात्र महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असलेल्या मतदारसंघांना वगळण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याणसह यवतमाळ-वाशिम, नाशिक, वायव्य मुंबई, ठाणे, पालघर या विद्यमान खासदारांच्या मतदारसंघांनाही पहिल्या यादीत स्थान देण्यात आलेले नाही.

शिवसेनेच्या ठाकरे गटाने १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्याच्या दुसऱ्या दिवशी शिंदे गटाने आठ उमेदवारांची घोषणा केली. शिवसेनेतील फुटीनंतर १३ खासदार शिंदे गट आले असले, तरी पाच मतदारसंघ पहिल्या यादीत टाळण्यात आले आहेत.

रामटेकचे विद्यमान खासदार कुणाल तुमाने यांना उमेदवारी नाकारण्यात आली असून तेथे काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवे यांना पक्षाने तिकीट दिले आहे. वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर यांनाही उमेदवार दिली जाणार नसल्याचे पक्षाच्या गोटातून सांगण्यात येते.

मात्र शिंदे गटाचे प्राबल्य असलेल्या कल्याण  ठाणे मतदारसंघांची घोषणा न झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. घराणेशाहीचा आरोप होऊ नये म्हणूनच पुत्र डॉ. श्रीकांत यांचे नाव पहिल्या यादीत नसावे, असे सांगितले जात आहे.

मात्र ठाणे मतदारसंघावर भाजपने दावा केल्यानंतर ठाणे आणि कल्याण मतदारसंघांमध्ये आदलाबदलीची शक्यता असल्याचे भाजपच्या गोटातून सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी दोन्ही मतदारसंघांमध्ये ‘थांबा आणि वाट पाहा’ अशी भूमिका घेतल्याचे समजते.

नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार शिंदेंबरोबर असले तरी त्यांच्या उमेदवारीला भाजप व राष्ट्रवादीचा विरोध आहे. सातारा मतदारसंघ भाजपला सोडण्यात आल्याने नाशिक मिळावा, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. तेथे छगन भुजबळ इच्छुक असून त्याला यांना उमेदवारी द्यावी अशी राष्ट्रवादीची भूमिका असून, त्याला भाजपही अनुकूल आहे.

त्यामुळे गोडसे यांच्यासह नाशिकमधील कार्यकर्त्यांनी मुंबईत ठाण मांडले आहे. यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी भाजपने मुख्यमंत्र्यांना सूचना केल्याचे समजते. या मतदारसंघातून मंत्री संजय राठोड यांना उमेदवारी देण्याचे घाटत आहे. वायव्य मुंबईतून नवा चेहरा दिला जाईल, असे संकेत दिले जात आहेत.

तेथे गुरुवारीच पक्षात प्रवेश केलेले अभिनेते गोिवदा यांच्या नावाची चर्चा आहे. याखेरीज राहुल शेवाळे (दक्षिण मध्य मुंबई), संजय मंडलीक (कोल्हापूर), सदाशिव लोखंडे (शिर्डी), प्रतापराव जाधव (बुलढाणा), हेमंत पाटील (हिंगोली), श्रीरंग बारणे (मावळ) व धैर्यशिल माने (हातकणंगले) यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page