लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून सर्व पक्षात वाद सुरु असल्याचे दिसत आहे. त्यातच राज्यात सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटात चांगलीच स्पर्धा सुरु होती. या जागेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही असे तिन्ही पक्षांचे नेते सातत्याने सांगत होते.
त्यातच शिवसेनेच्या ठाकरे गटाने दोन दिवसांपूर्वी त्यांच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये १७ उमेदवारांची नावे असून यात सांगलीच्या जागेचाही समावेश आहे. सांगलीतून ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली.
परंतु, या उमेदवारीला माविआच्याच घटक पक्ष काँग्रेसने विरोध केला आहे. काँग्रेस नेते विशाल पाटील हे सांगलीतून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होते.
त्यास पलूस-कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांच्यासह स्थानिक काँग्रेस नेत्यांचा पाठिंबादेखील आहे. परंतु, ठाकरे गटाने या जागेवरून त्यांचा उमेदवार जाहीर केला असल्याने मविआत तणाव निर्माण झालाय.
शरद पवार यांनी उद्धव ठाकरे – काँग्रेसमध्ये भांडण लावलं सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला आहे. यावरून शिवसेनेच्या शिंदे गटाने महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगलीच्या जागेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षात भांडण लावलं आहे. ही शरद पवारांची खेळी असून ठाकरे गट त्या खेळीत अडकला आहे.
खरंतर ही शरद पवारांनी खेळलेली खेळी संजय शिरसाट म्हणाले, ज्या सांगलीत शिवसेना उबाठा पक्षाचे अस्तित्व नाही, जी जागा ते कधी लढले नाहीत त्या जागेवर उबाठा गट आणि काँग्रेसमध्ये तिढा कसा काय निर्माण होईल. मुळात हा तिढा निर्माण व्हावा म्हणून ही ठरवून केलेली खेळी आहे. उबाठा गटाचं सांगलीवर कसलंही प्रेम नाही.
ज्याला त्यांनी सांगलीतून उमेदवारी दिली आहे तो डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील काही उबाठा गटाचा कार्यकर्ता नाही. ज्याच्यासाठी उबाठा गट आग्रही भूमिका मांडतोय तो चंद्रहार पाटील शिवसैनिकही नाही. खरंतर ही शरद पवारांनी खेळलेली खेळी आहे. त्या खेळीत उबाठा गट फसला आहे. उबाठा गट आणि काँग्रेसनं भांडायचं आणि शरद पवार दुरून मजा बघणार.