शिंदे गटाच्या नेत्याचं खळबळजनक विधान ; “पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय झाला..”

Photo of author

By Sandhya

“पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय झाला..”

राज्याच्या राजकारणात भाजप नेत्या आपल्या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा वारंवार समोर येत असतात. अशात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी माझ्या पक्षाचे १४५ आमदार निवडून आले तर पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करणार असं खळबळजनक विधान केलं होत.आता या विधानावरून राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येऊ लागल्या आहेत.

जनकरांच्या वक्तव्यावर शिंदे गटाच्या नेत्याने देखील प्रतिक्रिया दिली आहे. आपला पक्ष सत्तेत असून देखील पंकजा मुंडे यांना विविध गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो.

पक्षातच पंकजा यांची गळचेपी होत असल्याची भावना अनेकदा मुंडे समर्थक बोलून दाखवतात. अशात आता पंकजा मुंडेंवर अन्याय झाला आहे अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

संजय गायकवाड म्हणाले,”हे खरं आहे की, पंकजा मुंडेंवर अन्याय झाला आहे. ज्यांच्या वडिलांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि समाजासाठी खूप काही केलं, पण असं कुठेतरी वाटतंय की मागच्या काही निवडणुकांमध्ये त्यांच्यावर अन्याय झाला आहे.”

महादेव जानकर नेमकं काय म्हणाले होते ? भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी मला मुलगा मानले होते. पंकजा मुंडे या माझ्या बहीण आहेत.

माझ्या पक्षाचे १४५ आमदार निवडून आले, तर मी नक्‍कीच पंकजा मुंडे यांना मुख्‍यमंत्री करेल.आम्हाला भाजपामध्ये पक्ष विलीन करा, असे सांगण्‍यात आले होते. पण आम्ही पक्ष विलीन केला नाही. आम्ही होतो म्हणून भाजपाचे सरकार आले.

Leave a Comment