राज्यात मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कात दसरा मेळावा कोण घेणार ? यावरून राजकारण सुरु झाले होते. मात्र या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांनीही शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास आग्रह धरला होता.
आता मात्र शिंदे गटानं एक पाऊल मागे घेत, दसरा मेळाव्याचा शिवाजी पार्क मैदानावरचा आपला दावा सोडला असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महापालिकेकडे शिंदे गटाने शिवाजी पार्कसाठी केलेला अर्ज शिंदे गट मागे घेणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर सदा सरवणकर स्वतः मुंबई महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज मागे घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यावर्षी १ ऑगस्ट रोजी ठाकरे गटाने तर ७ ऑगस्ट रोजी शिंदे गटाने महापालिकेकडं शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी अर्ज केला होता. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा न्यायालयात जाणार कि काय असा सवाल निर्माण झाला होता.
मात्र आता शिंदे गटाने आपला अर्ज मागे घेण्याचे ठरवले आहे. दरम्यान, दोन्ही गटाने आझाद मैदान किंवा क्रॉस मैदानात मेळावा घेण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचाच मेळावा पार पडणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.