पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या माध्यमातून पुण्याचा महापौर हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा होणार असून याबाबतचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यादृष्टीने पक्ष संघटनही बळकट करण्यात येणार आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
महाराष्ट्राचा विकास व्हावा यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने केंद्रातील एनडीए व राज्यातील महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुका महायुक्ती एकत्रितपणे लढणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लोकसभा मतदार संघनिहाय आढावा बैठका घेऊन त्याबाबत नंतर योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने येत्या दि. 27 ऑगस्टला बीड येथे सभा घेण्यात येणार असून या सभेपासून महाराष्ट्रातील दौऱ्याला सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेच्या नऊ मंत्र्याकडे प्रत्येकी तीन-चार जिल्ह्यांची दौऱ्यांची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करण्याला प्राधान्य देण्यात येणार असून शासकीय योजनांच्या कामकाजाचा आढावाही घेण्यात येणार आहे, असे तटकरे यांनी सांगितले. महायुतीची राज्यस्तरावर समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. आता विधानसभा व जिल्हानिहायही या समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.
तालुका,जिल्हास्तरावरील समित्या व विविध महांडळांवर काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी नमूद केले आहे.
70 हजार कोटीच्या घोटाळ्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाष्याचा विषय आता आमच्या दृष्टीने संपला आहे. एनडीएमध्ये आम्ही सहभागी झाल्यानंतर नवाब मलिकांना न्यायालयाकडून मिळालेला जामीन याचा दूरान्वये काहीही संबंध नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.