दिवसेंदिवस नवनवीन बांधकामे वाढतच आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न आणि हवा प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. भविष्यात यामुळे निर्माण होणार्या गंभीर परिस्थितीचा विचार करून नवीन बांधकामे बंद करून नागरिकांना भेडसावणारे प्रश्न सोडवा; अन्यथा एक डिसेंबर रोजी महापालिकेला घेराव घातला जाईल,
असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. बारामती लोकसभा मतदार संघातील महापालिका हद्दीत समावेश झालेल्या गावांमधील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी खा. सुळे यांनी शुक्रवार महापालिका अधिकार्यांची बैठक घेतली.
या बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक विशाल तांबे, सचिन दोडके, मृणाल वाणी यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खा. सुळे म्हणाल्या, लोकप्रतिनिधी नसल्याने दोन वर्षांपासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दुष्काळ व पुण्याच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न विचारात घेऊन शासनाने व प्रशासनाने योग्य नियोजन करावे, ज्या ज्या वेळी मी पुण्यात किंवा इतर ठिकाणी जाते, तेव्हा नवनवीन इमारतींची कामे सुरू दिसतात.
हे असेच सुरू राहिले, तर पुढील काळात पाणी, वाहतुकीसह मूलभूत प्रश्न ऐरणीवर येणार आहेत. त्यामुळे शासनाने नवीन बांधकामांवर निर्बंध आणणे गरजेचे आहे. मी विकासाच्या विरोधात नाही, मात्र, नियोजन महत्त्वाचे आहे.