एक वर्ष आणि पाच महिने तुरुंगात असलेले अनुशक्तीनगरचे आमदार नवाब मलिक यांना सोमवारी (दि.१५) जामीन मिळाला. तुरुंगातून सूटका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची मिरवणूक काढली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेते नवाब मलिक यांना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत.
सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिकांची भेट घेतल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नवाब मलिक यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली आहे. यावेळी मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि हसन मुश्रीफही उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून स्वागत; नवाब मलिक कोणत्या गटात? मनी लाँडरिंगप्रकरणी मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २३ फेब्रुवारी २०२२ रोजी आपल्या कार्यालयातच अटक केली होती. तुरुंगात गेल्यापासून ते जामीनासाठी प्रयत्न करत होते. पण त्यांना यश आले नाही.
अखेरीस प्रकृतीच्या कारणास्तव पुढील दोन महिन्यांसाठी मलिकांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील बलॉर्ड इस्टेट येथील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयासमोर तर अजित पवार गटाने मंत्राल्यासमोरच्या पक्ष कार्यालयासमोर फटाके फोडत आनंद व्यक्त केला.
राष्ट्रीय प्रवक्ते असलेले मलिक यांचे पक्षातील नेते, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चांगले संबंध आहेत. मात्र, पक्षफुटीत अजित पवार यांच्यासोबत किमान चाळीस आमदार गेल्याचा दावा करण्यात येत आहे.
पण हा आकडा किती, हे अद्याप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुद्धा सांगत नाहीत. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्यात अजूनही आमदार खेचाखेची सुरूच आहे. तुरुंगातून सोमवारी सुटका झाल्यानंतर समर्थकांनी काढलेल्या मिरवणुकीत शरद पवार यांच्या कन्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या.
तर अजित पवार गटाकडूनही त्यांचे स्वागत झाले. या गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे हे कुर्ला येथील क्रिटिकेअर या हॉस्पिटलमध्ये येऊन भेटले.