श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची सेवा व अन्नदान सेवेतून उमटला वारकरी भक्तीचा संस्कार

Photo of author

By Sandhya

पिंपळी-लिमटेक ग्रामस्थांचा सामूहिक सहभाग

पिंपळी – बारामती तालुक्यातील पिंपळी-लिमटेक येथे श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने वारकरी भाविकांसाठी महाप्रसाद व अन्नदानाचा सेवाभावी उपक्रम उत्साहात पार पडला.अनेक वर्षांपासून गावात सुरू असलेली ही सेवा यंदाही ग्रामस्थांच्या सामूहिक सहकार्य, देणगी आणि शिध्याच्या माध्यमातून पार पडली.गावातील महिला,युवक व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली.या प्रसंगी पालखी सोहळा प्रमुख त्रिगुण गोसावी यांचा शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. उपस्थित ग्रामस्थांनी वारकऱ्यांना प्रेमाने भोजन वाढले,त्यांच्या आवश्यकतेची विचारपूस केली आणि भक्तिभावाने सेवाकार्य केले. संपूर्ण उपक्रमात सेवाभाव,समर्पण आणि माणुसकीचे दर्शन घडले.वारी ही केवळ पायी चालण्याची परंपरा नसून सेवा,समता,भक्ती आणि मानवतेचा संदेश देणारा जीवनोत्सव आहे.याच भावनेतून पिंपळी-लिमटेक ग्रामस्थांनी कोणताही वैयक्तिक मोठेपणा न मिरवता एकत्रितपणे अन्नदानाचा उपक्रम यशस्वी केला.ग्रामस्थांच्या सामूहिक सहभागामुळे या सेवाकार्यात आत्मीयता आणि संस्कारांची सुंदर जोड लाभली.
वारकरी भाविकांनीही ग्रामस्थांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले. अन्नदान,सन्मान आणि निस्वार्थ सेवाभाव यांचा सुंदर संगम घडल्याने पिंपळी-लिमटेक येथील हा उपक्रम यंदाच्या पालखी सोहळ्यात विशेष ठरला.गावकऱ्यांच्या एकोप्यामुळे आणि सामूहिक सहभागामुळे वारीची सेवा परंपरा अधिक बळकट होत असून,भविष्यातही ही भक्तीची आणि समाजसेवेची परंपरा अखंड सुरू राहील,अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Leave a Comment

You cannot copy content of this page