मी कधीही राजकारण केलं नाही. समाजकारणच करत आलो आहे, तसेच कधीही कुणाला दुखावलं नाही. त्यामुळे माझ्यावर लोकांचे प्रेम असून, लोकशाहीतील राजे सर्व काही ठरवतील. सध्या मी या संपर्क दौऱ्यांच्या माध्यमातून गाठीभेटी घेत आहेत. मला काहीही लपवायचं नाही, मी निवडणुकीला उभा राहणारच, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी महाबळेश्वर दौऱ्यात व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज महाबळेश्वर, पाचगणी परिसरात संपर्क दौरा करून गाठीभेटी घेतल्या, तसेच क्षेत्र महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिर येथे श्री शंभू महादेवाचे दर्शन घेऊन महापूजा केली व आशीर्वाद घेतले.
यावेळी सुनील काटकर, प्रीतम कळसकर, किशोर शिंदे, किसन शिंदे, संतोष आखाडे, प्रकाश पाटील, संदीप साळुंखे, सुनील शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महाविकास आघाडीतून तुमच्या विरोधात प्रबळ उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीही त्यांना उमेदवार सापडेना झाला आहे. यावर उदयनराजे म्हणाले, ‘‘मी आजपर्यंत कधीही राजकारण केलं नाही, समाजकारणच केलं. कुणाला दुखावलंही नाही. माझ्यावर लोकांचे प्रेम असून, लोकशाहीतील राजे सर्व काही ठरवतील.’’
तुमचे चिन्ह जाहीर झालेलं नाही तरी तुम्ही कमळ चिन्ह घेऊन जिल्हा पिंजून काढत आहात. अचानक घात होऊ शकतो का? दिल्लीवरून तुम्हाला काही संकेत आले आहेत का? या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, ‘‘जोपर्यंत ताकद आहे, तोपर्यंत मी लोकांची सेवा करणार.’’ उदयनराजेंनी निवडणूक बिनविरोध करण्याचा डाव आखला आहे का? असे विचारले असता त्यांनी सगळ्यांचे माझ्यावर प्रेम आहे.
त्यामुळे ते देखील विचार करताहेत. आपण म्हणतोना, बच्चा समझ के छोड दिया, आता हा बच्चा मोठा झाला आहे, त्यांना समजलंय. मला माझं कार्य केले पाहिजे. त्यांनी त्यांचे कार्य केले पाहिजे. काही असलं तरी या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होईल, असेही उदयनराजेंनी नमूद केले.
सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध… शशिकांत शिंदे, श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण यापैकी कोणाशी सर्वांत जास्त मैत्रीचे संबंध आहेत, या प्रश्नावर उदयनराजेंनी दिलखुलास उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘माझे वैचारिक मतभेद असतील; पण सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांचे विचार त्यांच्याजवळ. माझे विचार माझ्याजवळ.
चर्चेतून मार्ग काढू शकतो. कोणाला कमी लेखायचा प्रश्नच नाही. ही सगळी मित्रमंडळी असून, श्रीनिवास पाटील हे तर माझ्या वडिलांचे खास मित्र आहेत. याबाबत दिल्लीत त्यांनी मला सांगितलं होत की, मी तुमच्या बारशाला उपस्थित होतो. त्यावेळी मी पाळण्यात होतो.
त्यामुळे त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी निश्चित आहे. अनेकदा पावसामुळे सगळं झालं, असे तुम्ही सर्वजण म्हणता; पण सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. धरणे कोरडी पडली आहेत. त्यामुळे देवाची कृपादृष्टी व्हावी आणि पाऊस पडावा, तरच लोकांची कृपादृष्टी होईल,’’ असे त्यांनी नमूद केले.
कॉलरची स्टाइल कुठून आली..? आम्ही घाटाईच्या मंदिराला भेट देण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी प्रत्येकाची एक स्टाइल असते. तशी तुमची काय स्टाइल असेल? असे विचारले होते.
त्यावर मलाही वाटले काय तरी केलं पाहिजे. मी माझी कॉलर उडवली आणि हीच माझी स्टाइल आहे, असे सांगितले. यावर ‘कॉलर वाला’ अशी टीकाही झाली; पण माझ्यावर लोकांचा जीव आहे, तो कोणीही काढून घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.