‘‘निवडणूक रोख्यांबाबतचे बिंग फुटल्यामुळे जनतेचे लक्ष इतरत्र वेधण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे,’’ असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या महारॅलीला सुरुवात होण्यापूर्वी ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदी व भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. एक प्रकारे ही हुकूमशाही आहे, असा दावा ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेक लोक असे आहेत की ज्यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले होते. मात्र नंतर या लोकांना पक्षात घेत त्यांच्यावरील गुन्हे रद्द करण्यात आले.
दुसरीकडे जे लोक भाजपच्या विरोधात बोलतात, त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकले जात आहे. देशात हुकूमशाही येईल अशी भीती नाही, तर हुकूमशाही आली आहे. या हुकूमशाहीचा सामना आम्ही जनतेसमोर येऊन करणार आहोत.
‘‘निवडणूक रोख्यांचा भाजप हा सर्वात मोठा लाभार्थी आहे. रोख्यांच्या माध्यमातून पैसा देणाऱ्या अनेक कंपन्या अशा आहेत की ज्यांच्यावर आधी तपास संस्थांनी छापे घातले होते.
भाजपला पैसे देणाऱ्या कंपन्यांना मोठी कंत्राटे मिळाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा गवगवा होऊ लागल्यामुळे जनतेचे लक्ष इतरत्र वेधण्यासाठी केजरीवाल यांना अटक करण्यात आली’’ असा आरोप ठाकरे यांनी केला.