
उद्योगमंत्र्यांचे सगळे उद्योग तुम्हाला माहिती आहेत. त्यांचे स्वत:चे उद्योग जोरात सुरू आहेत. त्यांनी दावोसमधून किती उद्योग आणले, कोण-कोण बरोबर होते, हा खासगी दौरा होता का, असे प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीच्या सभेत उद्योगमंत्री उदय सामंत यांना टीकेचे लक्ष्य केले.
तुम्ही शिवसेनेमध्ये 2014 मध्ये आलात आणि म्हणे आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत. बाळासाहेब होते तेव्हा तुम्ही आमच्याविरुद्ध आमच्याशी लढत होतात. लाचारी करून तुम्ही आमच्याकडे आलात, तरीही मंत्रिपदाचे दिलेले वचन आम्ही पाळले; मात्र तुम्हीच गद्दारी केलीत, अशी जहरी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
रत्नागिरीतील आठवडा बाजार येथील शिवसेना कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेला खा. विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आ. राजन साळवी, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, जिल्हाप्रमुख विलास चाळके, सहसंपर्कप्रमुख राजू महाडिक, प्रमोद शेरे, राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये, बशीरभाई मुर्तुझा यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, 2014 साली आले आणि हे खर आहे की, मी त्यांना मंत्रीपदाचा शब्द दिला होता. मंत्रीपदाचा मी माझा शब्द पाळला पण, ज्यांनी मला शब्द दिला तो शब्दाला कमी पडला. मी तुला मंत्रीपद दिलं होतं. 2019 मध्येही त्यांना मंत्रीपद देण्याची तशी गरज नव्हती. कारण पहिल्या वेळी मंत्रीपदाचा दर्जा दिला होता.
पण आम्ही बाळासाहेबांचे पुत्र शब्दाचे पक्के. त्यांना बोलावून सांगितलं शब्द दिला होता तुम्ही विसरला असाल मी नाही विसरलो. 2019 मध्ये मी सांगितले जा आणि मंत्रीपदाची शपथ घ्या. त्यांनी घेतली आणि ते पळाले. त्या गद्दाराचं करायचं काय म्हटल्यानंतर तुम्ही म्हणता खाली डोकं वर पाय. पण ज्याला डोकंच नाही आणि त्याचे डोकं कुठलं ,पाय कुठले हेच कळत नाही.
त्याचं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. बिनडोक माणसाचं करायचं काय हा प्रश्न आहे, अशा शब्दात ठाकरे यांनी सामंत यांच्यावर टीका करताना गद्दारांचे आता डिपॉझिट जप्त करायचे असून ते पुन्हा ब्र काढणार नाहीत यासाठी काम करा असे आवाहनही त्यांनी केले. या नतदृष्टांनी बाळासाहेबांच्या फोटोची आणि खुर्चीची किंमत लावली आहे.
पण त्या खुर्चीत जेव्हा बाळासाहेब होते आणि त्यांनी मोदींना वाचवले. त्यामुळे आज पंतप्रधान पदाची खुर्ची मोदींना मिळाली. बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदींना जाऊन विचारा आणि मोदींना जर जाण असेल तर त्या खुर्चीची किंमत मोदी सांगतील. कारण त्या खुर्चीची किंमतच होऊ शकत नाही, असंही ठाकरे म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणाले की, अटलजी जेव्हा पंतप्रधान होते आणि जे काही त्यावेळेला गुजरातमध्ये घडले होते किंवा घडवले गेले होते त्या वेळेला वाजपेयींनी सांगितलं होतं की, राजधर्म का पालन करना होगा. तेव्हा वाजपेयी यांना हे मान्य नव्हतं. त्यावेळेला वाजपेयी मोदींना काढून टाकायला निघाले होते.
त्या वेळेला याच खुर्चीत बसलेल्या बाळासाहेबांनी अडवाणींना सांगितलं होतं की, मोदी गया तो गुजरात गया आणि त्या खुर्चीची तुम्ही किंमत करता, अशा शब्दात ठाकरे यांनी भाजपला सुनावले. राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. परंतु, कोर्टाने निर्णय दिला म्हणून हे मंदिर होऊ शकले. मागील 38 वषार्ंत का मंदिर झाले नाही, याचाही भाजपाने विचार करायला हवा.
सध्या राम राज्य नाही तर सर्वसामान्यांनी मरा राज्य झाले आहे. बीजेपीची अवस्था बाहेरची जनता पार्टी अशी झाली असल्याची टीका उध्दव ठाकरे यांनी केली. गृहखाते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याच भाजपाच्या आमदाराने पोलीस स्थानकात गोळीबार केला. त्यामुळे आता देवेंद्रजी लापता झाले आहेत.
राजन साळवीं व कुटुंबावर गुन्हा दाखल केलात. आमची सत्ता येऊ द्या, ज्यांनी बाळासाहेबांच्या खूर्चीची किंमत केली त्यांची लायकी काय आहे हे दाखवून देऊ, असा इशाराही उध्दव ठाकरे यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगधंदे गुजरातला नेत असून, गुजरात विरुध्द संपूर्ण देश अशी भिंत त्यांनी उभी केली आहे.
मात्र, गुजरातची चाकरी करणार्यांना या गोष्टी काय समजणार असा टोला मारतानाच शिवसेनेचे हिंदुत्व हे घरातील चुली पेटवण्याचे काम करते तर भाजपाचे हिंदुत्व हे घरे पेटवणारे असल्याची टिकाही त्यांनी केली.
मेळाव्यास मुस्लिम समाजाची मोठ्या संख्येने उपस्थिती शिवसेना ‘उबाठा’चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रत्नागिरीच्या दौर्यात काय बोलतात, हे ऐकण्यासाठी शिवसैनिकांसह मुस्लिम समाज बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होता. मुस्लिम समाजाच्या प्रमुख पदाधिकार्यांनी स्टेजवर जाऊन ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले.