लोकसभा निवडणुकीच्या निकालाशी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा संबंध नाही. आम्ही तीनही पक्षाचे प्रमुख नेते विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जागावाटप निश्चित करू. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने साहजिकच भाजपला झुकते माप राहील, मात्र इतर मित्रपक्षांचाही योग्य सन्मान राखला जाईल या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यातील राजकारणाचे संकेत दिले आहे.
नागपूर विमानतळावर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी 85 – 90 जागा मिळाल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा लढणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात ते माध्यमांशी बोलत होते.
विधानपरिषदच्या जागा आम्ही निश्चितच योग्यरित्या लढणार आहोत, मनसेशी अद्याप चर्चा झाली नाही. यासोबतच विधानसभेचे तिन्ही पक्षांचे नेते समन्वयातून निर्णय घेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संजय राऊत हे भांग पिऊन बोलतात संजय राऊत हे भांग पिऊन बोलतात आणि लिहितात. त्यामुळे त्यांच्या बाबतीत मला बोलायचेच नाही. मी वारंवार माध्यमांना बोलताना हे स्पष्ट केले आहे. असेही फडणवीस यांनी रोखठोक मधील लेखनासंदर्भात एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वात एनडीएचा मोठा विजय होईल, नेत्यांनी सांगितले त्यानुसार बहुमत आम्ही गाठले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा देशाची धुरा सांभाळतील.
मात्र ते कधी पंतप्रधान पदाची जबाबदारी घेतील हे मी सांगू शकत नाही असेही त्यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी (दि.10) जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपनाची शपथ घेतील असे वक्तव्य केले.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी याबाबत निश्चित सांगता येत नाही, असे विधान केले. याबाबतीत फडणवीस पुढे म्हणाले, पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाबाबत पोलीस गांभीर्याने तपास करीत आहेत. याच तपासामुळे आरोपीताच्या सीडीआर व इतरही सर्व आवश्यक बाबीचा पोलिसांनी उलगडा केला.
घेतलेले रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचेही याच तपासामुळे कळू शकले. डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडे आरोपीचेही रक्ताचे नमुने होते, त्यामुळे या प्रकरणात कुणालाही मुलाहिजा केला जाणार नाही. कुणाचेही दडपण यात नाही, असा दावा फडणवीस यांनी केला.