उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ‘मुंबईतील अद्ययावत स्वतंत्र पहिले सायबर पोलीस स्टेशन लवकरच कार्यान्वित’

Photo of author

By Sandhya

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वांद्रे पश्चिम येथे उभे राहणारे मुंबईतील अद्ययावत स्वतंत्र पहिले सायबर पोलीस स्टेशन लवकरच कार्यान्वित होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत याबाबत घोषणा केली.

सायबर गुन्हेगारीमध्ये होत असलेली वाढ आणि सामान्य माणसाची मोठ्या प्रमाणात होणारी आर्थिक फसवणूक पाहता मुंबईत स्वतंत्र अद्ययावत सायबर पोलीस स्टेशन असावे, अशी संकल्पना वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अँड आशिष शेलार यांनी मांडली. त्याला आवश्यक असणारी शासनाची जागा ही त्यांनी सूचवली.

ती मान्य करुन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सायबर पोलीस स्टेशन उभारण्यास मंजुरी दिली. त्याचे भूमिपूजन १५ जून २०१९ ला देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. बहुमजली इमारतीचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आहे.

स्वामी विवेकानंद रोडवर वांद्रे रेल्वे स्टेशनजवळ हे पोलिस स्टेशन उभे राहत आहे. त्यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान असलेले पोलीस स्टेशन, अधिकारी निवास आणि साबर ट्रेनिंग सेंटर उभारण्यात येणार आहे.

आज महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून आमदार ॲड. आशिष शेलार यांनी विधानसभेत हे स्टेशन कधी सुरू करणार याची विचारणा केली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्रातील वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर वांद्रे पश्चिम येथे सायबर क्राईम पोलीस स्टेशन, डीसीपी सायबर क्राईम, त्यांचे निवासस्थान आणि त्याची लॅब यांची इमारत उभी करण्यात आली आहे.

आता त्याच्या फर्निचरचे काम सुरू आहे. वाढते सायबर गुन्हे आणि त्यासाठी असणाऱ्या या इमारतीची आवश्यकता लक्षात घेऊन हे सायबर क्राईम पोलीस स्टेशन आणि लॅब किती दिवसांत सुरू करण्यात येईल. दरम्यान, संपूर्ण कामाचा आढावा घेऊन लवकरच हे सायबर क्राईम पोलीस स्टेशन आणि लॅब सुरू होईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment