उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा, “माझ्यासाठी भावूक क्षण”

Photo of author

By Sandhya

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशभरात रामभक्तांमध्ये आज (दि.२२) उत्साहाचे वातावरण आहे. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सर्वांना प्रतीक्षा असल्याने माझ्यासाठी आजचा क्षण भावूक आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.’रामलल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे’ असा आमचा नारा होता याकडे लक्ष वेधत, आजचा दिवस आनंदाचा उत्सव असल्याने कोणावरही टीका करणार नाही, असेही त्‍यांनी सांगितले.

अयोध्येत होणाऱ्या राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने नागपूरच्या कोराडी येथील जगदंबा माता मंदिरात सहा हजार किलोचा राम हलवा तयार केला गेला.

यानिमित्ताने माध्यमांशी बोलताना फडणवीस म्‍हणाले की, “आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. गेली पाचशे वर्ष तमाम हिंदू बांधवांनी जो संघर्ष केला, ज्या क्षणाची वाट पाहत लाखो लोकांनी बलिदान दिले, ज्याकरिता संघर्ष पेटला, जो भारतीय अस्मितेचा संघर्ष होता.

त्या राम मंदिराचे आज भव्य निर्माण होऊन त्या मंदिरात श्री रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केली गेली.”

सन 1528 साली बाबरचा सेनापती मीर बाकी याने मंदिर तोडलं, या मागची त्यांची संकल्पना होती की, जोपर्यंत भारतीयांच्या मनातून राम आणि कृष्ण काढणार नाही, तोपर्यंत भारतीयांना गुलाम करता येणार नाही.

म्हणून त्या ठिकाणचे राम मंदिर पाडून त्यांनी ‘बाबरी’ढाचा बांधला. मुळात ती मशीद नव्हती तर हिंदूंच्या छातीवर उभा केलेला एक ढाचा होता. जो हे सांगत होता की, तुम्ही आमचे गुलाम आहात आणि तुमचे रामही तुम्हाला वाचवू शकणार नाहीत.

यासाठी साधुसंत अनेक वीरांनी लढाई केली, यासाठी 18 लढाया झाल्या. ज्यामध्ये अनेक लोक शहीद झाले तरीही संघर्ष सुरूच होता. राजकीय स्वातंत्र्य मिळाले मात्र, सांस्कृतिक, अध्यात्मिक स्वातंत्र्य ही तेवढेच महत्त्वाचे आहे याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.

Leave a Comment