बागेश्वर धाम सरकार हे सनातन धर्माची सेवा करत असून, झोपलेल्या सनातनींना जागे करत आहेत. त्यामुळे पूर्ण देश जागृत होत असून, पर्यायाने विश्वाला जाग येत आहे. सनातन म्हणजे पुराणमतवाद, जातिवाद असा अपप्रचार काही लोकांकडून केला जातो.
सनातन हा भारताचा विचार असून, तो सर्वांना एकत्र जोडतो, त्यात कोणीही उच्च-नीच नाही, अशी सनातन शब्दाची व्याख्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली. पुण्यातील संगमवाडी येथे आयोजित दिव्य दरबार व हनुमान कथा सत्संग कार्यक्रमात फडणवीस यांनी बागेश्वर धाम सरकार यांची बुधवारी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुनील कांबळे, आयोजक जगदीश मुळीक, योगेश मुळीक यांच्यासह भाजपचे माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 22 जानेवारी रोजी देशात नवीन इतिहास रचला जात आहे.
रामलल्ला विराजमान होत आहेत, तिथे त्यांचे मंदिर साकार होत आहे. श्रीरामाचे आहेत म्हणून कामाचे.. पालखी मार्गाची कामे लवकर पूर्ण करावीत, अशी विनंती बागेश्वर धाम सरकार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत किंवा कोणत्या पक्षाचे आहेत, म्हणून मला आवडतात असे नाही, तर ते श्रीरामाचे आहेत म्हणूनच आमच्या कामाचे आहेत, असेही बागेश्वर धाम सरकार म्हणाले.